मोठी बातमी : सप्तश्रृंगी गडावरील दरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Saptashrungi fort: गडाच्या घाटात संरक्षक कठडा तोडून कार हजार फूट खाली दरीत कोसळलीय. यात सहा जणांचा मृत्यू झाला.
नाशिक: साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या सप्तश्रुंगी गडावर (Saptashrungi fort) कारचा मोठा अपघात झालाय. गडाच्या घाटात संरक्षक कठडा तोडून कार हजार फूट खाली दरीत कोसळलीय. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्यात चार महिलांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला आहे. यात पटेल कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय. हे सर्वजण नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी आहेत.
अपघात कसा झाला ?
पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटुंबीय रविवारी सप्तश्रुंगी देवीच्या दर्शनासाठी कारने गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते परतीच्या मार्गावर होते. गडावरून वाहन खाली येत असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार संरक्षक कठडा तोडून खाली कोसळले. तब्बल एक हजार फूट खोल कार कोसळल्याने कारमधील सहा जणांचा मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झालाय. कारचा चक्काचूर झाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांसह पोलिस मदतीला आले आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरू होते. तर या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोव्हा कंपनीची कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटून सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळल्याने कारमधील एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिंपळगाव येथील पटेल कुटुंबीय हे सप्तशृंग गडावर दर्शन घेऊन परतत असतांना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके, स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल असल्याने बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अंगावर काटा आणणारे हे दृश्य होते.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा, घाटरस्त्यावर योग्य दुरुस्ती नसल्याने, तसेच सुरक्षितेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्याने अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला. पोलिसांनी मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू केली असून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पुढे पाठवले आहे. या घटनेने पिंपळगाव व सप्तशृंगगड परिसरात शोककळा पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी
मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख मदतीची घोषणा
नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. “या भाविकांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
अपघातातील मृतांची नावं
१ ) कीर्ती पटेल
२ ) रसीला पटेल
३ ) विठ्ठल पटेल
४ ) लता पटेल
५ ) पचन पटेल
६ ) मणिबेन पटेल
