सुपारी फक्त १५ हजारांची, इतकी कमी आपल्या मरणाची किंमत असू शकते…?

  • Written By: Published:
सुपारी फक्त १५ हजारांची, इतकी कमी आपल्या मरणाची किंमत असू शकते…?

अहमदनगर : शाळेजवळ असलेली पानटपरी हटविल्यावरून सामाजिक कार्यकर्ते (social activities) व सीताराम सारडा शाळेचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सुपारी देऊन हा हल्ला घडवून आला होता. अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते हे हेरंब कुलकर्णी यांना भेटण्यासाठी येऊन त्यांना धीर देत होते. आता ते बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एक सविस्तर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मागील शनिवारी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. आजारी असल्याने गाडी चालवता येत नव्हती म्हणून मित्राच्या गाडीच्या पाठीमागे बसून शाळेतून येत होतो. अचानक आलेल्या गुंड तरुणांनी गाडी अडवून माझ्या दोन्ही पायावर, हातावर, पाठीवर आणि वाईट म्हणजे डोक्यात स्टीलच्या रॉडने मारहाण केली. गाडी चालवणारा मित्र सुनील कुलकर्णी याच्याही हातावर पायावर बेदम मार बसला.एकटा असतो तर मला कोणी उचलले असते ? कारण बघे कडेला असून कोणीहीमध्ये आले नाही.


हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; मुख्य दोन फरार आरोपी पोलिसांकडून जेरबंद

तसेच आम्ही दोघे दवाखान्यात गेलो. तिथून पोलीस स्टेशनला गेलो. तक्रार नोंदवली. पोलिसांनी खूप वेळ म्हणजे चास तास बसवून ठेवले. दुसऱ्या दिवशी नुसत्या पंचनाम्यासाठी २ तास अशा जखमी स्थितीत हे
सहन केले, असे कुलकर्णी म्हणतात.

कुटुंबीय घाबरतात, शाळेतील विद्यार्थी, पालक सरांना मारले म्हणून घाबरतील म्हणून मुद्दामच घटना जाहीर केली नाही. पोलीस केस पाठपुरावा करू असे ठरवले. दोन दिवस गप्प राहिलो. पण जवळच्या मित्रांना कळताच सारेच संतापले.त्या सर्वांनी एकत्र येऊन माझ्या घरी बैठक घेतली व थेट एसपी ऑफिसला जाऊन त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिले. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला, मुख्यमंत्री यांनी मलाही फोन केला आणि क्षणात चित्र बदलले. एसपी थेट घरी आले. ज्या पोलीस स्टेशनला मला चार तास बसवले ते पोलीस सतत घरी येत राहिले. दारापुढे पूर्णवेळ पोलीस आले आणि उलट तुम्ही असे आहात हे आधीच आम्हाला का नाही सांगितले..? ही तक्रार…आणि तुम्ही विशेष असाल तरच आम्ही लवकर दखल घेतो ही कबुली.

मग त्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे घरी आल्या.अनेक वर्षांचा स्नेह असल्याने त्यांनाही खूप वाईट वाटले. त्यांनी माझ्या घरातच पत्रकार परिषद घेतली. मग पोलिसांवर दडपण वाढले. उपसभापती नीलम गोऱ्हेनी पत्र पाठवले. शालिनीताई विखे, आमदार संग्राम जगताप असे अनेक नेते एसपी शी बोलले आणि आरोपी त्यानंतर एक दिवसात अटक झाले. या वेदनेत हे समाधान ही की समाजात अजूनही कार्यकर्त्यांबद्दल खूप आदर आहे. जिव्हाळा आहे.

नगरला येऊन मला फक्त तीन महिने झाले पण किमान तीन दिवसांत आठशे माणसे भेटून गेले. पंधराशेहून अधिक फोन आले. त्यात शहरातील सर्व राजकीय पक्ष नेते, नगरसेवक सामाजिक संघटना आणि सामान्य अनोळखी कितीतरी माणसे… विश्वंभर चौधरी यांच्यासह नाशिक, जालना,पुणे, संभाजीनगर,शिरूर अकोले अशा अनेक ठिकाणाहून लोक आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मेधा पाटकर, बाळासाहेब थोरात, विनोद तावडे, भालचंद्र कांगो, यशोमती ठाकूर, वसंत पुरके अशा अनेक मान्यवरांनी फोन केले. यातून एकटेपण वाटले नाही..याने अजून धैर्य आले.

कार्यकर्ता एकटा नसतो हे अनुभवता आले. अनेक शहरात लोकांनी निवेदने दिली. शारीरिक मारहाण होणे दुःखदायक असते. अपमानकारक असते. जखमेच्या वेदना असतात. पण माझेच मला विशेष वाटले की मी इतका अशक्त असूनही मी शांत होतो. उलट खाली पडल्यावर मी गाडीचा नंबर लक्षात ठेव असे सांगत होतो. किंचितही भीती वाटली नाही. मनोधैर्य कायम राहिले.
अस्वस्थ याने आहे की इतक्या छोट्या कारणाने इतक्या टोकाचे पाऊल लोक का उचलत असतील ? शाळेपासून १०० मीटर तंबाखू टपरी नसावी असे आदेश असताना त्याची अंमलबजावणी म्हणून माझ्या शाळेशेजारी असलेली एक ४६ वर्षे जुनी पानटपरी मी महापालिकेला पत्र देऊन हलवतो आणि आमची टपरी का हलवली ? म्हणून ते सुपारी देतात..हे किती भीषण आहे ? आपल्या शाळेचा परिसर तंबाखूमुक्त असावा असे सुध्दा शाळेने म्हणायचे नाही ? इतकी दादागिरी असावी ?

सगळे पाप खोके, ट्रीपल इंजिन सरकारचे; हेरंब कुलकर्णींची भेट घेताच सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

दुसरी वाईट गोष्ट म्हणजे ही सुपारी फक्त १५ हजार रुपयांची आहे म्हणजे ५ आरोपी असल्याने प्रत्येकी ३ हजार रुपयांची..इतकी कमी आपल्या मरणाची किंमत असू शकते…? अवघ्या ३ हजारात एखादा तरुण एका अनोळखी माणसाचा जीव घ्यायला तयार होतो ? त्याचे परिणाम काय होतील ? याचा विचार ही करत नाही ? आपले करियर उध्वस्त होईल.याचे कोणतेही भान का नसावे ?
तरुणाईत हिंसेची ही सहजता किती चिंताजनक आहे ? हातात कोयते, रॉड पेन किंवा संगणक न येता सहजपणे येत आहेत ?
आणि आपली मोठी शहरे किती बकाल होत आहेत. भर दुपारी १२ वाजता तरुण उठून कोणालाही मारून येतात कारण कोणीही आपले कोणीही बिघडवणार नाही याची त्यांना खात्री झाली आहे.

आपले प्रिय नेते आपल्याला वाचवतील याचे वचन त्यांना आहे. माझ्या अकोले तालुक्यात आम्ही अनेक बालविवाह थांबवले. अनेक दारू दुकाने बंद केली. भ्रष्टाचार तक्रारी केल्या. तडीपार करण्याची मागणी केली.शाळेच्या दारू दुकानाविरुध्द आंदोलन केले पण कोणीही कधीही हात लावला नाही शिवीगाळ नाही आणि इथे शहरी भागात नुसते टपरी काढण्याची तक्रार केली तर थेट जीवघेणा हल्ला….आपली शहरे किती बेताल आणि गुंडगिरी अड्डे होत आहेत.

शहरी भागातील राजकारण आणि गुंडगिरी हातात हात घालून पुढे जात आहे आणि तरुणाई त्याचे साधन म्हणून वापरले जात आहेत. जागा रिकाम्या करून घेणे, दहशत पसरवणे याला हे तरुण मुले लागतात. सुसाट वेगाने ट्रीपल सीट गाडी चालवणे हे या युवा कार्यकर्त्यांचे आकर्षण आहे. आम्ही विवेकी संवेदनशील तरुण घडवू शकलो नाही..हे शिक्षक म्हणून मला आमच्या शिक्षणाचे आणि मुलांवर लक्ष न ठेवणाऱ्या कुटुंबव्यवस्थेचे अपयश मला वाटते… जखमी झाल्यावर अंतर्मुख होताना हे सारे मनात येते आहे.. शिक्षणव्यवस्था घटक म्हणून अपराधी ही वाटते आहे..हे आम्ही काय घडवले आहे..?-
हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube