अवकाळीचा तडाखा…होळीच्या सणावर विरजण
नाशिक : काल रात्री जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊसामुळे रब्बी गव्हाच्या पिकाला चांगलाच तडाखा बसला आहे. या अवकाळी पाऊसामुळे द्राक्ष, गहू, कांदा, या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन होळीच्या सणाला शेतकऱ्यावरती मोठं संकट आलं आहे. होळीची पुरण अवकाळी पावसाने शेतकऱ्याकडून हिसकावून घेतली आहे.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हात तोंडाशी आलेल्या गव्हाच्या पिकाला बसला आहे. पावसाने झोडपलेल्या गव्हाचा रंग उडून प्रत खराब झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाने पिकांचे फार नुकसान झाले आहे. तसेच वादळात काही ठिकाणी मका व गव्हाचे पीक आडवे पडले आहे. तर द्राक्षाच्या बागा उफाळून पडल्या आहेत.
सध्या रब्बी पिकांची सोंगणी सुरू असून गहू काढणीच्या अवस्थेत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे गव्हाचे क्षेत्र तुलनेने जास्त आहे. आतापर्यंत गव्हाची काढणी पूर्ण झाली आहे. उशिरा पेरलेला गहू सोंगणीच्या अवस्थेत आहे. या गव्हाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काढणी पूर्ण झालेला व शेतात उभ्या असलेल्या पिकाला पावसाने झोडपले. त्यामुळे गव्हाचा रंग उडून प्रत खराब झाली आहे. या पिकाचा रंग उडाल्यामुळे कमी भाव मिळण्याची शक्यता आहे. हरभरा, ज्वारी, मका या पिकांचे तुलनेने नुकसान झाले नाही.
अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकात दाण्यात आत कुज पडण्याची, दाणे काळे होण्याची भीती आहे. रोग पडतील, उत्पादन खर्चही भरून निघणार नाही. दरम्यान गव्हाबरोबरच आंबा, हरभरा, द्राक्ष या पिकांनाही फटका बसणार आहे. द्राक्ष मण्यांना तडे जाऊन रस गळती होणार आहे. पावसामुळे आंब्यांना आलेला मोहर गळून पडला असून आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा पीक तर उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त होत आहे.