ऐतिहासिक बंडाची वर्षपूर्ती : महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे ते 10 दिवस…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन केलेल्या बंडाची मंगळवारी (२० जून) वर्षपूर्ती होत आहे. मुंबई-सुरत-मुंबई व्हाया गुवाहटी आणि गोवा या बंडाच्या प्रवासाने शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्तीही ३० जून रोजी होत आहे. (On year completed for Eknath Shinde Rebel in ShivSena)
यानिमित्ताने बंडापासून सत्ता स्थापनेपर्यंतच्या 10 दिवसांमधील नाट्यमय घडामोडींचा आढावा :
२० जून : राज्यसभा निवडणुकांचे मतदान संपल्यानंतर एकनाथ शिंदे २५ आमदारांसह सुरतकडे रवाना.
२१ जून : सकाळी एकनाथ शिंदेंसह 20 ते 25 आमदार असल्याची माहिती समोर. तर आपल्याला ३५ हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेचा दावा. विधिमंडळ गटनेतेपदावरुन शिंदेंची हकालपट्टी.
२२ जून : एकनाथ शिंदे त्यांच्यासोबतच्या आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले. मुंबईत ठाकरे यांनी सर्व आमदारांची एक बैठक बोलावली. यात मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारी उद्धव ठाकरेंनी दाखविली.
२३ जून : 22 जूनला पक्षाने बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहून शिस्तभंग केल्याबद्दल, एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी.
एकनाथ शिंदे आणि ३७ आमदारांनी अजय चौधरी यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हणतं पुन्हा एकदा शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषणा केली.
२४ जून : एकनाथ शिंदे यांना विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवळ यांनी धक्का दिला. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला झिरवळ यांनी मान्यता दिली.
२५ जून : शिवसेना विधिमंडळ पक्षातले बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला.
बंडखोर 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली. 48 तासांची मुदत देत त्यांची बाजू मांडण्याची नोटीस पाठवली.
दरम्यान शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणत्याही पक्षाला वा गटाला वापरता येणार नसल्यासह सहा प्रमुख ठराव मंजूर करण्यात आले.
मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील वडोदरा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गृहमंत्री अमित शहा हेही तेथे असल्याचे सांगण्यात आले.
२६ जून : अपात्रतेच्या कारणे दाखवा नोटीस आणि गटनेतेपद नियुक्ती या उपाध्यक्ष झिरवळ यांच्या निर्णयलाा एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
२७ जून : सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आणि उपाध्यक्ष झिरवाळ यांना अविश्वास प्रस्तावाबाबत तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले.
२८ जून : देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली.
२९ जून : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश.
राज्यापालांच्या आदेशाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर राज्यपालांचे आदेश कायम ठेवत ३० जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
३० जून : एकनाथ शिदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.