पवनराजे हत्याकांड : या प्रकरणाचा पायाच ठिसूळ, न्यायालयाचे मोठं निरीक्षण

पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता.

  • Written By: Published:
Pawanraje Nimbalakar

PawanRaje Nimbalkar Murder Case Verdict : 20 वर्षांपूर्वी विद्यामान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडावर आज (दि.20) अंतिम निकाल दिला जाणार असून कोर्टात निकाल वाचनास सुरूवात झाली आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते होते. त्याप्रमाणे पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी कोर्टात हजर झाले आहेत. या निकालाचे रिअल टाईम अपडेट देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…

LIVE NEWS & UPDATES

  • 20 Jun 2026 11:47 AM (IST)

    या प्रकरणाचा पायाच ठिसूळ आहे न्यायालयाचे मोठं निरीक्षण

    पवनराजे खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदारावर मात्र माफीच्या साक्षीदार याला मारहाण केल्यानंतर त्याने कबुली दिली या प्रकरणाचा पायाच ठिसूळ आहे न्यायालयाचे मोठं निरीक्षण. पवनराजे हत्याकांड सुनावणीत महत्त्वाची निरीक्षणे न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. पवनराजे निंबाळकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचे समोर आल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच पवनराजे यांनी 2003 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र दिल्याचाही उल्लेख करण्यात आला. याशिवाय या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत, केवळ त्या साक्षीपुरते मर्यादित न राहता तपासातून समोर आलेल्या इतर पुराव्यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. निकाल वाचनादरम्यान न्यायालयाने मागील अनेक न्यायनिर्णयांची उदाहरणेही सांगितली.

  • 20 Jun 2026 11:46 AM (IST)

    CBIने चांगला तपास केला' न्यायालयाची टिप्पणी

    बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल न्यायालयात वाचण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी न्यायालयाने प्राथमिक निरीक्षणात सीबीआयने या प्रकरणात चांगला आणि सखोल तपास केल्याचे नमूद केले. 20 वर्षांनी निकल देतोय असे सांगत एक आरोपी माफीचा साक्षीदार झाल्याचे न्यायमूर्ती म्हणाले.

     

  • 20 Jun 2026 11:30 AM (IST)

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकाल वाचनास सुरूवात

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकाल वाचनास सुरूवात. 2002 नंतर पवनराजे आणि पद्मसिंह हे कट्टर विरोधक बनले. या प्रकरणात 127 साक्षीदार तपासण्यात आले - कोर्ट

  • 20 Jun 2026 11:04 AM (IST)

    पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा घटनाक्रम

    3 जून 2006 : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

    सुरुवातीचा तपास : सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी केला, मात्र नंतर पीडित कुटुंबाच्या मागणीवरून आणि संशयास्पद पार्श्वभूमीमुळे हा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्यात आला.

    जून 2009 : सीबीआयने या प्रकरणात माजी मंत्री आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांना अटक केली. त्यांच्यावर राजकीय आणि व्यावसायिक वैमनस्यातून या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला.

    सप्टेंबर 2009 : अलिबाग सत्र न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांना जामीन मंजूर केला.

    जुलै 2011 : या खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीला (Trial) सुरुवात झाली.

    2011- 2026) : या काळात खटल्यामध्ये 128 साक्षीदारांची तपासणी झाली. यामध्ये अण्णा हजारे यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. पारसमल जैन हा या खटल्यातील माफीचा साक्षीदार बनला, ज्याने कटाबद्दल महत्त्वाचे खुलासे केले.

    मे/जून 2026 : तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर या खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. न्यायाधीशांनी निकाल तयार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे तो पुढे ढकलला गेला.

    20 जून 2026 : या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर होणे अपेक्षित.

  • 20 Jun 2026 10:58 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर कुटुंबियांसह कोर्टात दाखल 

    ओमराजे निंबाळकर कुटुंबियांसह कोर्टात दाखल

     

  • 20 Jun 2026 10:55 AM (IST)

    न्याय देवतेने न्याय करावा - ओमराजे निंबाळकर

    आयुष्यात ज्यासाठी संघर्ष केला, अपेक्षा हीच आहे की न्याय देवतेने न्याय करावा. ओमराजेंना बोलताना भावना अनावर झाल्या. भारतीय न्यायव्यस्थेवर माझा विश्वास आहे. त्या जोरावरच आम्ही मागील २० वर्षांपासून हा लढा देत आहोत.न्याय मिळण्यासाठी आम्ही संघर्ष करतोय सर्वसामान्यांच्या लोकांच्या आशीर्वादाने मी दोन्ही लढाया लढतो. राजे साहेबांच्या हत्येमुळेच मी राजकारणात आलो. आपल्याला राजकीय विरोधक नको म्हणून सुनियोजित कट रजून ही हत्या झाली होती, मला आपल्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, दोषींना फाशीच व्हावी, हीच माझी मागणी आहे.

  • 20 Jun 2026 10:54 AM (IST)

    ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

    पवन राजेनिंबाळकर दुहेरी हत्या प्रकरण आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 20 Jun 2026 10:51 AM (IST)

    गेल्या सुनावणीत काय घडलं होतं?

    पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची अंतिम सुनावणी 16 जून रोजी सुनावणी होणार होती. मात्र निकालाचं कम्पायलेशन झालं नसल्याने तारीख पुढे ढकलून 20 जून करण्यात आली होती. राजकीय वैरातून 35 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा CBI चा दावा आहे. या प्रकरणी एकूण 9 आरोपींवर खटला दाखल करण्यात आला असून यात पद्मसिंह पाटील, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, बसपा नेता कैलास यादव, शशीकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन यांचा समावेश आहे.

  • 20 Jun 2026 10:49 AM (IST)

    20 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

    हे प्रकरण 3 जून 2006 रोजी घडलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. पवनराजे निंबाळकर मुंबईहून धाराशिवकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली परिसरात त्यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्यासह चालक समद काझी यांचा मृत्यू झाला होता.

    या हत्येचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान राजकीय वैमनस्यातून हा कट रचण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आला. प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी काहींवर हत्येचा कट रचणे, तर काहींवर प्रत्यक्ष हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्याचा निकाल काय लागतो, आरोपींना शिक्षा होते की त्यांची निर्दोष मुक्तता होते, याकडे राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

follow us