पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या कुटूंबियांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर
Old Mumbai-Pune Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई हायवेवर (Pune-Mumbai Highway) एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात (accident) झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 ते 30 जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ (Near Shingroba Temple) पहाटे चार वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच मोदींनी PMNRF ( Prime Minister National Relief Fund ) मधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर जखमींच्या कुटूंबियांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, रायगडच्या बस अपघातात मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी आहे. ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा आहे.
Pained by the bus mishap in Raigad, Maharashtra. My thoughts are with those who have lost their loved ones. I hope that those injured recover quickly. The State Government is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 15, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेनंतर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर
दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.