Jayant Patil : अमेरिकेत शिकून आलेला तरुण पोरगा ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; आता ED च्या कचाट्यात

Jayant Patil : अमेरिकेत शिकून आलेला तरुण पोरगा ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा; आता ED च्या कचाट्यात

अमेरिकेतून सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलेला 21-22 वर्षांचा एक तरुण महाराष्ट्रात परत येतो. वडिलांचं छत्र हरपलं होतं. पण राजकारणाचा, सहकाराचा आणि समाजकारणाचा प्रचंड व्याप मांडून ठेवलेला असतो. अनेक कारखाने, संस्थांचे जाळे उभारलेले असते. हा व्याप आता हा तरुण पुढे घेऊन जायचं ठरवतो आणि राजकारणात प्रवेश करतो. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संपर्कातून काँग्रेसमध्ये येतो. 1990 मध्ये आमदार होतो. आजच्या घडीला हाच तरुण आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील प्रमुख नाव बनले आहे. (Political Journey of NCP leader Jayant Patil)

मागील ३ दशकांपासून एक एक पायरी चढत राज्याच्या राजकीय पटलावर एक अग्रगण्य चेहरा म्हणून पुढे आलेल्या या तरुणाचे नाव म्हणजे,

जयंत राजाराम पाटील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, गटनेते असलेले जयंत पाटील (Jayant Patil) आजपर्यंत सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तब्बल १७ वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. आधी काँग्रेस अन् नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बनलेले जयंत पाटील आज चर्चेत आले आहेत ते ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यामुळे. याच पार्श्वभूमीवर आज आपण जयंत पाटील यांचा संपूर्ण राजकीय प्रवास कसा होता हे समजून घेणार आहोत. (Who is Jayant Patil)

जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

पश्चिम महाराष्ट्रातील सधन भाग म्हणून ओळख असलेल्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूर भागातील साखराळे हे जयंत पाटील यांचं मूळ गाव. 16 फेब्रुवारी 1962 रोजी त्यांचा जन्म झाला. वडील स्वर्गीय राजारामबापू पाटील राज्यातील काँग्रेसचे मोठे नाव. पण जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे काँग्रेस सोडली अन् त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले. पुढे सरकार गेले पण राजारामबापू पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही.

Jayant Patil यांची ईडी चौकशी, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

वसंतदादा पाटील यांनी सांगलीचा, यशवंराव चव्हाण यांनी कराडचा विकास केला त्याप्रमाणेच राजारामबापू पाटील यांनी इस्लामपूर आणि वाळवा भागाचा कायापालट केला. अनेक कारखाने, सुतगिरण्या, दूध संघ स्थापन करत सहकारी संस्थांचे जाळे विणले. शाळा-कॉलेजची स्थापना करुन मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय केली. राजकारण आणि समाजकारणात एक एक पायरी वर चढत होते आणि तिकडे जयंत पाटील अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेत होते.

अशात राजारामबापू पाटील यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर जयंत पाटील यांनी साधारण 1990 च्या दशकात महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतला. वडिलांनी उभा केलेला राजकारणाच, समाजकारणाचा आणि सहकाराचा भला मोठा पसारा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं असल्याने राजकीय समज चांगली होती. गरज होती ती संधीची. ती मिळाली काँग्रेसमध्ये. जयंत पाटील काँग्रेसमध्ये आले, राजारामबापू पाटील यांनी उभं केलेलं कार्यकर्त्यांच जाळ जयंत पाटील यांनी तरुण फळीच्या माध्यमातून आणखी घट्ट केलं.

१९९० साली जयंत पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभेचा गुलाल उधळला. पूर्वीच्या वाळवा आणि आताच्या इस्लामपूर मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1995 ला ते पुन्हा आमदार झाले. पुढे 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर जयंत पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बडे नेते काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत सामील झाले.

बिनविरोध संचालक, आज थेट चेअरमन! Jayant Patil पुत्राची जोरदार राजकीय एंट्री

त्याचवर्षी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आणि राज्यात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार स्थापन झाले. यानंतर त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 1999 मध्ये आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी आली. 2008 पर्यंत त्यांनी सलग तब्बल 9 अर्थसंकल्प मांडले. 2008 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री म्हणून जबाबदारी आली. 2009 ते 2014 या काळात ते ग्रामविकास मंत्री होते. अशी तब्बल 15 वर्ष त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली.

जयंत पाटील यांच्या जमेच्या बाजू :

जयंत पाटील यांची मुळची ओळख मितभाषी नेता अशी आहे. गरजेपेक्षा अधिक ते बोलताना दिसत नाहीत. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा ज्या माजी मंत्र्यांच्या चरित्र आणि चारित्र्यामुळे उजळली आहे, त्यात जयंत पाटील यांचेसुद्धा नाव येते. निष्कलंक चारित्र्य ही जयंत पाटील यांच्या जमेची बाजू. मतदारसंघातील कोणत्याही माणसाला थेट कनेक्ट असलेला नेता म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या इस्लामपूरमधील घरी आणि कार्यालयात, मुंबईतील घरी आणि कार्यालयात लोकांची गर्दी दिसून येते.

जयंत पाटील यांनी आज साखर कारखाने, सहकारी दूध संघ, सहकारी बँक, सहकारी वस्त्रोद्योग संकुल, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प, कासेगाव शिक्षण संस्था या माध्यमातून भागात सहकाराचे आणि कार्यकर्त्यांचं भक्कम जाळे तयार केलं आहे. याच माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, सांगली जिल्हा परिषद अशा सर्वच क्षेत्रावर राष्ट्रवादीचं वर्चस्व अबाधित ठेवलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube