2014 मध्येच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारचा प्रस्ताव; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2014 मध्येच आपल्यासमोर आला होता.

News Photo   2026 08 21T171427.211

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते (Congress) पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2014 मध्येच आपल्यासमोर आला होता, असा दावा चव्हाण यांनी केला. मात्र त्यावेळी आपण हा प्रस्ताव तात्काळ नाकारला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

2014 मध्ये काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सरकार स्थापनेचा प्रस्ताव आपण त्याच वेळी फेटाळला, असे चव्हाण यांनी सांगितले. त्यावेळी काँग्रेसची राजकीय भूमिका आणि परिस्थिती वेगळी होती. मात्र पुढील पाच वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रस्ताव आपणच पुढे केला, असा दावा त्यांनी केला.

2014 मध्ये नाकारलेला प्रस्ताव 2019 मध्ये प्रत्यक्षात आला आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या समीकरणाची सुरुवात 2019 मध्ये झाली, त्याची चर्चा प्रत्यक्षात पाच वर्षांपूर्वीच झाली होती, असे चव्हाण यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य जाण्याच्या चर्चेवरही चव्हाण यांनी भाष्य केले. फडणवीस यांना दिल्लीत जायचे आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र महाराष्ट्रातील एखाद्या व्यक्तीला दिल्लीच्या राजकारणात मोठी जबाबदारी दिली जात असेल तर त्याकडे बढती म्हणून पाहिले जाईल, असे ते म्हणाले.

मात्र अशी बढती काँग्रेसला मान्य नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या दिल्लीतील भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

follow us