Pune Metro Viral Video : मेट्रो कोचमध्ये पाणी कसं साचलं? प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मेट्रोमध्ये साचलेले पाणी हे पावसाचे नसून HVAC प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाले होते.

  • Written By: Published:
Untitled Design 90 1

Pune Metro Viral Video : राज्यातील झपाट्याने विकसित होणारे शहर आणि महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाचा विस्तार वेगाने होत असून काही महिन्यांपूर्वीच नव्या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे पुणे मेट्रोच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मेट्रोच्या डब्यात पाणी साचल्याचे दृश्य समोर आल्यानंतर प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

जोरदार पावसानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये मेट्रो कोचच्या आत पाणी साचलेले दिसत असल्याने अनेकांनी ही पावसाच्या पाण्याची गळती असल्याची चर्चा सुरू केली. यावर आता पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. पुणे मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 मे 2026 रोजी सायंकाळी 6.40 वाजता लाइन-2 वरील रामवाडी मेट्रो स्टेशन येथे ट्रेन सेट-5 मध्ये घडली होती.

शरद पवार यांनी पत्रकार राजदीप सरदेसाई यांची माफी का मागितली होती?

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मेट्रोमध्ये साचलेले पाणी हे पावसाचे नसून HVAC प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाले होते. धुळीमुळे ड्रेनेज पाइप चोक झाल्याने एसीमधून तयार होणारे कंडेन्सेशनचे पाणी बाहेर पडू शकले नाही आणि ते कोचमध्ये साचले. ट्रेन ऑपरेटरने ही बाब तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित HVAC युनिट बंद करण्यात आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू झाल्याने विविध शहरांमध्ये पावसाळ्यापूर्व कामांना वेग आला आहे. स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची कामे सुरू करण्यात आली आहेत. पुणे मेट्रोचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी आगामी पावसाळ्यातील शहराच्या वाहतूक व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, प्रशासनाने हा प्रकार केवळ तांत्रिक अडचणीमुळे घडल्याचे स्पष्ट करत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

follow us