सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ, प्रतितोळ्याचा दर 58 हजारांवर
मुंबई : सर्वसामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली दबलेला आहे. अशातच आता माहागाईनं त्रस्त लोकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरांत उसळी पाहायला मिळत आहे. आज (दि.17) दुपारी 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 245 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. सोन्याच्या दरांनी 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडल्याचं पाहायला मिळतंय.
नवीन वर्षाची सुरुवात माहागाईनं झालीय. एकीकडं मंदीचं सावट असतानाच दुसरीकडं सोनं दिवसेंदिवस वधारतंय. लग्नसराईमुळं सोन्याची मागणीदेखील दिवसेंदिवस वाढत चाललीय.
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, सोमवारी 16 जानेवारीला सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता 56 हजार 883 रुपये प्रतितोळा एवढा दर होता. अशा प्रकारे सोन्याच्या दरानं पुन्हा नवा उच्चांकी स्तर गाठलाय. आज दुपारी सोन्याच्या दरानं 58 हजारी पार केलीय.
काही वर्षांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ झाल्याचं दिसून येतंय. गत 5 वर्षांत सोनं झपाट्यानं वाढलंय. गेल्या 9 महिन्यांत तर सोन्याचे दर दुप्पटीने वाढलेत. त्यामुळं सोनं खरेदी करणं हळूहळू आवाक्याबाहेर जाताना दिसून येतंय. येत्या काळात तुम्ही सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोन्याची शुद्धता तपासणं गरजेचं असतं.