‘हेच’ संघाचे संस्कार का? सामनातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘हेच’ संघाचे संस्कार का? सामनातून देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, नागपुरात तब्बल 110 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरताहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का? असा खोचक सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय.

नागपूरमधील भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी नेमली असती तर त्यांचं चरित्र आणखी उजळून निघालं असतं, असं म्हणत फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरमध्ये गेलेल्या बोक्यांच्या खोके सरकारचे मेंदू तेथील थंडीनं गारठले आहे. अधिवेशनात चिखलफेक करून सरकारनं महापुरुषांच्या अपमानाचा विषय मागं ढकलला आहे.

शिवरायांच्या अपमानावर दुसऱ्याच विषयांनी कुरघोडी करणाऱ्या सरकारच्या पेंढाऱ्यांचेच राज्य आले म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर शाब्दीक हल्ला केलाय. शिवसेनेतून बंड करण्यासाठी शिंदे गटानं खोके घेतल्याचं आमदार महेश शिंदे सांगताना त्याची एसआयटी चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता शिवसेना शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाल्याची पाहायला मिळतेय. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरेंची बाजू लढवण्यासाठी खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं एक टीम नागपूरमध्ये पाठवलीय. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपमध्ये नागपुरात जोरदार राजकीय खडाजंगी पाहायला मिळू शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube