जिकडे सत्ता तिकडे बलात्कारी; मुख्यमंत्री फडणवीस राजकारणात दंग, संजय राऊतांकडून थेट घणाघात

Sanjay Raut : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षातील हेच महान सामाजिक कार्यकर्ते आहेत. हे महाराष्ट्र घडवणार आहेत. (Sanjay Raut) जसा नेता त्यांची तशी खालची टपोरी चिल्लर पोरेबाळे आहेत, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षावर टीका केली आहे. फडणवीस यांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
ती माझी पोरगी, तुम्हाला पोलिसांत खेचणार, रक्षा खडसेंचा थेट आरोपीला कॉल, क्लिप व्हायरल..
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून पोलीस खाते, कायदा-सुव्यवस्था आणि जनतेचे प्रश्न पाहायला वेळ मिळत नाही. जळगावात विनयभंग करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. वाल्मिक कराड, कृष्णा आंधळे, धनंजय मुंडे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मोठे सामाजिक काम त्यांनी महाराष्ट्रात उभे केले आहे.
आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न
जिकडे सत्ता तिकडे बलात्कारी, खून आणि व्यभिचारी आहेत. ठाण्यात आम्ही गेल्यावर आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न गुंडांनी केला. आनंद दिघे यांच्या आश्रमासमोर आमच्या गाड्या अडवल्या. हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आनंद दिघे यांना पुष्पहार अर्पण केल्यावर तो हार आणि शाल रस्त्यावर फेकून देत अपमान केला. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारे तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षातील हेच महान सामाजिक कार्यकर्ते आहेत.
रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग
केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल, तर राज्यातील सामान्य लेकीबाळींची काय परिस्थिती असेल? फक्त लाडकी बहीण-लाडका भाऊ खुळखुळे वाजवून फार काळ राहता येणार नाही. रोज लाडक्या बहिणींचा विनयभंग होत आहे. महादेव मुंडे यांची पत्नी परत उपोषणाला बसत आहे. त्यांची मुलगी लाडकी बहीण नाही का?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.