चोरमंडळ म्हणताच सत्ताधाऱ्यांचा संताप; राऊतांविरुद्ध हक्कभंगाची चाल
Sanjay Raut : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.
हे वाचा : Sanjay Raut मंत्रालयाजवळचे झाड हलवा, भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं पडतील!
शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधीमंडळ हे तर चोर मंडळ आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असे राऊत म्हणाले होते. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रे दाखवावीत असे आव्हान राऊत यांनी दिले.
Sanjay Raut : कंगना, ही कोण शहाणी ? ती तर.. राऊतांनी कंगनाला फटकारले
चोरों को भी नजर आते है चोर
राऊत यांच्या वक्तव्याचे राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी यावर कडाडून हल्ला चढविला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, की संजय राऊत यांचे नैराश्य समजू शकतो. एक हिंदी सिनेमाचे गाणे आहे. चोरों को भी नजर आते है चोर. हा विधानसभा सगळ्या सदस्यांचा अपमान आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे.
माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले,की राऊत यांनी जर असे वक्तव्य केले असेल तर ते तपासून पाहिले पाहिजे. हे योग्य नाही. कुणीच अशा पद्धतीने वक्तव्य करणे बरोबर नाही.विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, की मी राऊत यांच्या वक्तव्याशी सहमत आहे असे नाही. त्यांचे वक्तव्य तपासून पहावे. यावर विधीमंडळ योग्य ती कारवाई करेल.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधाऱ्यांना आयतीच संधी मिळाली आहे. कांदा हमीभाव, गॅसदरवाढ, महागाई या मुद्द्यांवर बॅकफूटवर गेलेल्या सरकारला या मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी हा मुद्दा मिळाल्याची चर्चा सुरू आहे.