पब्लिसिटीसाठी टी-शर्ट घालून हवा करण्याचा मोर्चा, ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चावर संजय शिरसाटांचा निशाणा
मोर्चावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे.
Sanjay Shirsat criticizes the Thackeray brothers’ ‘Garjana Morcha’ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईत गर्जना मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. आज मुंबईत जो मोर्चा निघतोय, त्यापेक्षा दोन भाऊ एकत्र येतायेत याची चर्चा आहे. पब्लिसिटीसाठी हा मोर्चा आहे. टी-शर्ट घालून हवा करण्याचा हा मोर्चा आहे. अर्धा किलोमीटर चालायचं आणि मोर्चा यशस्वी झाला असं दाखवायचं, अशी खिल्ली शिरसाट यांनी उडवली.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील मोर्चा असल्याचे सांगितले जात असले, तरी इतर राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग किती आहे, असा सवालही त्यांनी केला. एकातरी पक्षाने तुम्हाला सहकार्य केलं का? या मोर्चाचं नेतृत्व नेमकं कोणाचं, उद्धव ठाकरेंचं की राज ठाकरेंचं? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने या मोर्चाला वेगळे राजकीय महत्त्व देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही शिरसाट म्हणाले. त्यांच्या मते, केवळ टी-शर्ट आणि घोषणांमुळे कोणताही मोर्चा मोठा ठरत नाही. हा इव्हेंट आहे, कसली गर्जना? हातात हात घालून फोटो काढण्याचा हा मोर्चा आहे, असे म्हणत त्यांनी आंदोलनाच्या स्वरूपावर टीका केली.
भाजपने पत्ते उघडले! विधानपरिषदेसाठी तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
जर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात गंभीर आक्षेप असतील, तर ठाकरे बंधूंनी हा मुद्दा दिल्लीपर्यंत नेण्याचे आव्हानही शिरसाट यांनी दिले. खरंच प्रश्न असेल तर जंतर-मंतरवर जा, चलो दिल्ली म्हणा, असे ते म्हणाले. शरद पवार किंवा इतर विरोधी पक्षांचा या मोर्चाला प्रत्यक्ष पाठिंबा आहे का, असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला. ठाकरे बंधूंच्या या आंदोलनामागे व्यापक विरोधकांची एकजूट आहे का, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हा मोर्चा राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी आणि स्वतःचे यश सिद्ध करण्यासाठी काढण्यात आल्याचा दावाही शिरसाट यांनी केला. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भातील मागणी योग्य असल्यास केंद्र सरकार त्याचा विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘गर्जना मोर्चा’वरून ठाकरे बंधू आणि सत्ताधारी गटातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.