दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी शरद पवार मैदानात; पुढील तीन दिवस चार जिल्ह्यांचा दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद!
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी मैदानात उतरणार आहेत.
Sharad Pawar hits the ground to inspect drought-affected areas : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना आता ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः दुष्काळी भागांच्या पाहणीसाठी मैदानात उतरणार आहेत. पुढील तीन दिवसांत ते राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी किंवा उभ्या पिकांच्या नुकसानीचे संकट ओढवले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही भागांत गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीनशेहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम मदतीची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत कधी मिळणार आणि नुकसानभरपाई किती मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एल निनोचा प्रभाव ओसरणार, आता ला निना सक्रिय होण्याची शक्यता, भारतावर काय परिणाम?
दिवाळीपूर्वी राज्य सरकारमधील मंत्री, विविध विभागांचे अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली होती. आता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारही दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्यात ते केवळ प्रशासकीय माहिती घेण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्यासमोरील अडचणी, पाण्याची उपलब्धता, चारा टंचाई, पीक नुकसान आणि सरकारी मदतीबाबतची स्थिती जाणून घेणार आहेत.
राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारकडून विविध मदतीच्या घोषणा करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्ष मदत मिळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा कायम आहे. अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, रब्बी हंगामाच्या तयारीवरही दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर ते सरकारकडे कोणत्या मागण्या मांडणार, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी काय भूमिका घेणार आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला कोणते जाब विचारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाने 34 नगरसेवक अडचणीत; फेरनिवडणुकीची टांगती तलवार
एकीकडे सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना सुरू असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे विरोधी पक्षांकडून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांचा हा तीन दिवसांचा दौरा केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या दृष्टीनेच नव्हे, तर राज्यातील राजकीय वातावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.