Video : ‘राजा’ अन् ‘वजीरावर’ थेट हात, बारामती दौऱ्यावेळी पवारांची बुद्धिबळावरील चाल चर्चेत

Sharad Pawar Plying Chess Video बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Published:
Sharad Pawar

Sharad Pawar Plying Chess Video Goes Viral : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय खेळींची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, यावेळी त्यांच्या राजकीय नव्हे तर बुद्धिबळाच्या पटावरील खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बारामती दौऱ्यावर असताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट मांडला आणि त्यानंतर घडलेला क्षण सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

बारामतीकडे जात असताना शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी शाळा करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

बुद्धिबळाच्या पटावरील चाल ठरली चर्चेचा विषय

या भेटीदरम्यान एका विद्यार्थिनीने शरद पवार यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट आणला. पट पाहताच पवार यांनी काही क्षण त्यावरील मोहरे निरखले आणि त्यानंतर राजा आणि वजीराच्या खेळीशी संबंधित चाल खेळली. हा क्षण उपस्थितांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. राजकीय डावपेचांसाठी प्रसिद्ध असलेल्या शरद पवार यांनी बुद्धिबळाच्या पटावरही सहजतेने चाल खेळल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विद्यार्थिनींच्या नेतृत्वाचे केले कौतुक

या भेटीनंतर शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामतीला जात असताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमासोबत विविधांगी उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग आणि नेतृत्व उल्लेखनीय आहे.

बदलत्या काळातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली विचारक्षमता, सृजनशीलता आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असल्याचे पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. राजकारणातील आपल्या अचूक डावपेचांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या या बुद्धिबळावरील सहज खेळीने मात्र पुन्हा एकदा ‘राजकीय चाणक्य’ आणि ‘बुद्धिबळाचा खेळाडू’ अशी त्यांची प्रतिमा चर्चेत आणली आहे.

follow us