शरद पवारांना धक्का ‘बडा नेता’ अजित पवार गटात करणार प्रवेश, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिले संकेत
Sunil Tatkare : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) नेते, अनेक कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर आता दुसरीकडे एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच शरदचंद्र पवार पक्षातील (NCPSP) बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले. ते आज माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, चांद्यापासून बांद्यापर्यंत आता आमच्या पक्षात इनकमिंग सुरू आहे. तसेच एक बडा नेताही आमच्या पक्षात येणार आहे. असा दावा देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) , संजीवराजे निंबाळकर (Sanjeevraje Nimbalkar) हे मागे अजितदादांना भेटले होते. त्यांनी अजितदादांसोबत सखोल चर्चाही केली आहे. पण त्यांच्याबाबत आतापर्यंत काही निर्णय झालेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी संजीवराजे असतील या सर्वांनीच शरद पवार साहेबांसोबत जाण्याता निर्णय घेतला होता. पण संजीवराजे निघून गेल्यावर सुध्दा त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आमचा उमेदवार विजयी झाला होता. असं सुनील तटकरे म्हणाले. तसेच संजीवराजे यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
लोक बेघर होत आहे, त्याला विकास म्हणता येणार नाही, राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
विधानसभा निवडणुकीत योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केलं नाही, असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता. माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे जेव्हा शिवसेना नेते रामदास कदम याबाबत तक्रार करणार तेव्हा मी त्याची माहिती घेऊन त्यांच्याशी चर्चा करतो, रामदास भाई आणि माझे चांगले संबंध आहे. असं देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.