शिंदेंची झोळी वर्षभरात ठाकरे बंधूंपेक्षा जास्त भरली; आयोगाने सांगून टाकले आकडे
ECI Report On Political Party Donation महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सातत्याने चर्चेत असतो.
Election Commission Report On Political Party Donation : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सातत्याने चर्चेत असतो. आता या राजकीय संघर्षाची आकडेवारी पक्षांना मिळालेल्या देणग्यांमधूनही समोर आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तब्बल 139.92 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेल्या एकत्रित देणग्या सुमारे 2.75 कोटी रुपये आहेत. म्हणजेच, शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांच्या तुलनेत जवळपास 51 पट अधिक देणग्या मिळाल्या असल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या फॉर्म 24A अहवालांमधून ही आकडेवारी समोर आली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर TV9 हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे.
शिंदेंची शिवसेना कुठे, तर ठाकरे बंधूंचे पक्ष कुठे?
प्रकाशित वृत्तानुसार 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालानुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अंदाजे 139.92 कोटी रुपये देणगी मिळाली. तर, ठाकरेंच्या शिवसेनेला अंदाजे 1.25 कोटी रुपये आणि राज ठाकरे यांच्या मनसेला अंदाजे 1.50 कोटी रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या या आकडेवारीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा सुमारे 112 पट, तर राज ठाकरे यांच्या मनसेपेक्षा सुमारे 93 पट अधिक देणग्या मिळाल्या आहेत. पण, ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांच्या देणग्या एकत्र केल्या, तरी त्यांची रक्कम शिंदेंच्या शिवसेनेच्या तुलनेत खूपच कमी आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला 75 कोटींच्या मोठ्या देणग्या
शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेल्या एकूण 139.92 कोटी रुपयांच्या देणग्यांमध्ये बांधकाम, पायाभूत सुविधा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचा वाटा महत्त्वाचा असल्याचे अहवालातील तपशीलातून दिसत आहे. यातील तीन मोठ्या देणग्यांची एकत्रित रक्कम तब्बल 75 कोटी रुपये आहे. म्हणजेच, पक्षाला मिळालेल्या एकूण घोषित देणग्यांपैकी सुमारे 53.6 टक्के रक्कम या तीन देणग्यांतून आली आहे. पक्षाने सादर केलेल्या अहवालात HOABL Management, SB Infocash आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित इतर कंपन्यांची नावांचाही उल्लेख असून, धनादेश, डिमांड ड्राफ्ट आणि RTGS यांसारख्या माध्यमांतून या देणग्या मिळाल्याचे नमुद करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोणाकडून देणग्या?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 1.25 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. पक्षाने सादर केलेल्या तपशिलात ज्युनिपर हॉटेल्स (ग्रँड हयात), अझिमा मॅनोर प्रायव्हेट लिमिटेड आणि म्युच्युअल ग्रोथ फंडाशी संबंधित नावांचा समावेश आहे.
राज ठाकरेंच्या मनसेला किती देणग्या मिळाल्या?
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुमारे 1.50 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. पक्षाच्या अहवालात सारस्वत कन्स्ट्रक्शन, पायोनियर हाउसिंग तसेच स्थानिक संस्था आणि समर्थकांकडून मिळालेल्या देणग्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
फॉर्म 24A रिपोर्ट नेमका काय सांगतो?
राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांबाबत निवडणूक आयोगाकडे तपशील सादर करावा लागतो. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींनुसार, ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांची माहिती पक्षांना जाहीर करावी लागते. फॉर्म 24A मध्ये साधारणपणे एका आर्थिक वर्षात 20 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या देणग्यांचा तपशील दिला जातो.