साताऱ्यातील शिंदेंच्या शिवसेनेला घरचा आहेर; शिवसेनेच्या आमदाराने पत्नीला मिळवून दिली भाजपची उमेदवारी

अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात समन्वय झाल्याचे स्पष्ट संकेत.

  • Written By: Published:
Untitled Design (298)

Shiv Sena MLA gets his wife BJP nomination : जिल्ह्यात भाजपाने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यांमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात समन्वय झाल्याचे स्पष्ट संकेत दिसून आले.

कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनी भाजपच्या चिन्हावर खटाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय खेड आणि कोडोली गटांमध्ये भाजपचे उमेदवार अर्ज भरताना आमदार शिंदे यांच्या भगिनी डॉ. अरुणा बर्गे उपस्थित होत्या. दुसरीकडे, कोरेगाव तालुक्यात भाजपाने थेट उमेदवार न देता शिंदेसेनेशी समजूत केल्याचे चित्र आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आणि शिंदेसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी महायुतीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीस भाजपचे दोन्ही मंत्री आणि आमदार अनुपस्थित राहिले. केवळ औपचारिक प्रतिनिधी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना पाठवण्यात आल्याने शिंदेसेनेत नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजपाची आक्रमक भूमिका आणि वाढती महत्त्वाकांक्षा लक्षात घेता शिंदेसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेते पर्यायी राजकीय समीकरणांबाबत चर्चा करत असल्याची माहिती आहे.

1800 कोटी खर्च, 10 कोटी भाविक अन् 3 हजार कोटींचं दान; राममंदीर प्राणप्रतिष्ठेनंतर दोन वर्षांत काय-काय झालं?

कोरेगाव मतदारसंघातील जागावाटपाबाबत साताऱ्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीस आमदार महेश शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. या चर्चेदरम्यान कोडोली आणि खेड भागात लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी मांडल्याची चर्चा आहे. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघात उमेदवार निवड करताना भाजप आणि शिंदेसेना यांनी परस्परांची राजकीय अडचण होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे दिसते.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा तालुक्यातील कोडोली आणि खेड गटांचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार रिंगणात उतरले असून त्यांना आमदार शिंदे कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती लाभली. तर कोरेगाव तालुक्यातील चार गटांमध्ये शिंदेसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून भाजपाने तिथे थेट उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. खटाव गटात प्रिया शिंदे यांच्या उमेदवारीमुळे भाजप–शिंदेसेना यांच्यातील समन्वय अधिक ठळक झाला आहे.

दरम्यान, आमदार महेश शिंदे यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले असता, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये असताना कोरेगाव मतदारसंघातून तयारी करत होते. मात्र, युतीतील जागावाटपामुळे ही जागा शिवसेनेकडे गेल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पुढे शिवसेनेतील फूटीनंतर ते शिंदे गटात सामील झाले. तथापि, त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या भाजपमध्ये सक्रिय असल्याने शिंदे यांनी भाजपाविरोधात थेट बंडखोरी केली नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

Tags

follow us