बदलीसाठी पैसे घेतले, खैरेंच्या मुलाच्या ऑडिओ क्लिपने खळबळ
औरंगाबाद : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप (audio clip) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral) झाली. यामध्ये वन खात्याच्या बदलीकरिता एका व्यक्तीकडून खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी २ लाख रुपये घेतल्याच या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचे काम झाले नसल्याने, सदर व्यक्ती पैसे परत मागत असल्याचे या ऑडीओ क्लिपमधून जाणवत आहे. तर पैसे देण्याविषयी गेल्या काही दिवसांपासून ऋषी खैरे टाळाटाळ करत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये समोर येत आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता असताना हा व्यवहार झाल्याचा देखील या ऑडिओ क्लिप मधून समोर आले. विशेष म्हणजे ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचे मान्य केले.
कोरोना काळात आधी माझा एका मित्र त्याच्या पत्नीची बदली करण्यासाठी माझ्याकडे आला होता. यावेळी ठाकरे सरकार असल्याने करून देऊ, असे मी त्याला सांगितले होते. पण अचानक कोरोना आला आणि यानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. पण त्यांचे काय पैसे माझ्याकडे असतील ते देण्यासाठी मी तयार असल्याचं ऋषिकेश खैरे म्हणाले. मात्र महाविकास आघाडीच्या काळात पैसे देऊन बदल्या केल्या जात होत्या का ? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले आहे.
ऋषीकेश खैरे व संबंधित व्यक्तीमध्ये झालेला संवाद..
ऋषी खैरे: हॅलो
विजय: बोला भाऊ
ऋषी खैरे: कुठे आहे तू…
विजय: इकडे शेंद्राला होतो
ऋषी खैरे: आ…
विजय: शेंद्राला
ऋषी खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले
विजय: अरे हौ ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये..काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही..तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले
ऋषी खैरे: आज काय तारीख आहे, 23 तारीख आहे…पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.
ऋषी खैरे: हंड्रेड पर्सेंट होईल
विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो
विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी
ऋषी खैरे: अच्छा दिलेले आहे का?
विजय: हो…
ऋषी खैरे: पैसे देऊन टाकतो
विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी…
ऋषी खैरे: होय…
विजय: बरं ठीक आहे चालेल…