ॲड. अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, प्रॉपर्टीच्या वादातून आजोबांनीच झाडली नातवाच्या छातीत गोळी
अभय मराठे यांचे आजोबा मोतीराम रावजी मराठे यांनीच परवानाधारक 12 बोअर रायफलमधून गोळी झाडून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
Shocking turn in the case of Adv. Abhay Marathe’s death : लोणावळ्यातील माजी नगरसेवक माणिक मराठे यांचा मुलगा ॲड. अभय मराठे यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. अभय मराठे यांचा रायफल साफ करताना चुकून गोळी सुटून मृत्यू झाल्याचे सुरूवातीला सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून अभय मराठे यांचे आजोबा मोतीराम रावजी मराठे यांनीच परवानाधारक 12 बोअर रायफलमधून गोळी झाडून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.
लोणावळ्यातील भुशी परिसरातील हॉटेल मोतीराम येथे सोमवारी, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे 11 वाजता ही घटना घडली. गोळीबारात अभय मराठे यांच्या छातीत गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. सुरूवातीला हा प्रकार रायफल साफ करताना झालेला अपघात असल्याचं कुटुंबियांकडून पोलिसांना सांगण्यात आलं होतं. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि तपासादरम्यान समोर आलेल्या विसंगतीमुळे पोलिसांना या कथित अपघाताबाबत संशय आला.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वैद्यकीय पुरावे, हॉटेलमधील कामगारांची चौकशी, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपासाची दिशा बदलली. त्यानंतर अभय मराठे यांचा मृत्यू अपघाती नसून गोळी झाडून करण्यात आलेला खून असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय मराठे आणि त्यांचे आजोबा मोतीराम मराठे यांच्यात मालमत्ता आणि हॉटेलच्या मालकीवरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी देखील व्यवहाराच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ऑफिसवर सीबीआयची छापेमारी, भ्रष्टाचार आणि ‘कॅश-फॉर-ट्रान्सफर’ प्रकरणात मोठी कारवाई
या वादातून संतापलेल्या मोतीराम मराठे यांनी त्यांच्या परवानाधारक रायफलमधून अभय यांच्या छातीत गोळी झाडल्याचा आरोप आहे. घटनेनंतर हा प्राक्कर अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा देखील दावा पोलिसांनी केला आहे. त्यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर काढून लपवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे खून केल्याच्या आरोपसोबतच पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा देखील तपास करण्यात आला. याप्रकरणी मोतीराम रावजी मराठे यांच्यासह हिरामण मोतीराम मराठे, मनोज होरमन मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोतीराम मराठे यांना पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपींवर पुरावे नष्ट करणे आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांबाबत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोतीराम मराठे यांच्याकडे दोन परवानाधारक रायफल होत्या. त्यापैकी एक 12 बोअर रायफल त्यांनी 1970 मध्ये, तर दुसरी रायफल 1980 मध्ये खरेदी केली होती. मोतीराम यांना शिकारीची आवड असल्याने त्यांनी या रायफली खरेदी केल्या होत्या आणि यापूर्वी त्यांचा शिकारीसाठी वापर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील एका रायफलीतूनच अभय मराठे यांच्यावर गोळी झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राज्यात पावसाचा जोर ओसरला, ऑक्टोबर हिटमुळे नागरिक हैराण, काही जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता
अभय मराठे यांना तीन भाऊ असून, कुटुंबातील काही सदस्यांचे मोतीराम मराठे यांच्याशी यापूर्वीपासून मतभेद असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. घटनेनंतर कुटुंबातील काही सदस्यांनी ज्येष्ठ व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे लोणावळ्यात खळबळ उडाली असून, सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून समोर आलेल्या घटनेचा तपास खुनापर्यंत पोहोचल्याने अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.