टीसीएस प्रकरणात मोठी घडामोड; मतीन पटेलांची तीनदा चौकशी, इम्तियाज जलीलांनाही SIT चे समन्स?

मोबाईल फोनमधील डेटाच्या आधारे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 41

SIT summons Imtiaz Jalil too? : राज्यभरात चर्चेत असलेल्या टीसीएस लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणात आता आणखी एक महत्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची विशेष तपास पथकाने आतापर्यंत तीन वेळा सखोल चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या आलेल्या मोबाईल फोनमधील डेटाच्या आधारे तपास यंत्रणेला काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात एसआयटीने आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात न्यायालयात मुख्य दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान समोर आलेले नवीन तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटाच्या आधारे पोलीस लवकरच पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, निदा खानला राहण्यासाठी घर मिळवून दिल्याच्या आरोपांवर मतीन पटेल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याचे दावे फेटाळून लावले. निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले.

विदेशी गुंतवणूकदारांना सरकारी बाँडवरील व्याज आणि नफ्यावर करमाफी, रुपयाच्या घसरणीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

निदा खानशी ओळख कशी झाली याबाबत स्पष्टीकरण देताना मतीन पटेल म्हणाले की, तिचे आई-वडील कौटुंबिक वादाच्या कारणास्तव मदतीसाठी त्यांच्याकडे आले होते. ती गर्भवती असल्याने मानवी दृष्टिकोनातून तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यात मदत केली होती. आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, इम्तियाज जलील यांना या प्रकरणात राजकीय हेतूने गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप मतीन पटेल यांनी केला. इम्तियाज जलील हे माझे राजकीय नेते आहेत. त्यांच्याशी झालेला संपर्क हा केवळ वैयक्तिक किंवा राजकीय कारणांपुरता मर्यादित होता.

निदा खान प्रकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्या फोनचे सर्व कॉल रेकॉर्ड्स पोलिसांकडे उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, एसआयटीकडे उपलब्ध झालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रकरणात आणखी कोणाची चौकशी होणार आणि तपासातून कोणते नवे खुलासे समोर येणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us