गहिनीनाथ गडावर धस-मुंडे एकाच व्यासपीठावर; गप्पा रंगल्या पण ‘संघर्ष संपलेला नाही’, सुरेश धसांची ठाम भूमिका

दीर्घकाळापासून राजकीय संघर्षात असलेले आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसलेले दिसले.

  • Written By: Published:
Untitled Design 56

Suresh Dhas firm stance : बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात एक वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळालं. दीर्घकाळापासून राजकीय संघर्षात असलेले आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकाच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसलेले दिसले. इतकंच नाही तर दोघांमध्ये मनमोकळा संवाद देखील रंगताना दिसला. या दृश्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरू झाली.

या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्यामुळे भाजप आणि महायुतीतील अनेक नेत्यांची देखील उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात सुरेश धस यांचा उल्लेख केल्याने राजकीय वातावरण अधीकच रंगतदार झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही धस-मुंडे यांच्यातील संघर्ष संपलेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, संघर्ष अजूनही सुरू आहे आणि तो पुढे देखील सुरू राहील.

मात्र, हे अध्यात्माचं व्यासपीठ आहे, इथे राजकारण नाही. इथून खाली उतरल्यावर पुन्हा राजकारण सुरू होईल. या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. कारण, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील तपासू अधिकच वाढला होता.

दरम्यान, कार्यक्रमात झालेल्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना धस म्हणाले व्यासपीठावर आमच्यात कोणतीही विशेष चर्चा झाली नाही. ते पाहुणे म्हणून आले होते, त्यामुळे बोलणं औपचारिक होतं. स्टेजवर लगेच भांडण करायचं का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, मस्साजोग येथील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, स्थानिकांच्या विनंतीनुसार निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

एकूणच, गहिनीनाथ गडावरील या कार्यक्रमामुळे धस आणि मुंडे यांच्यातील संघर्ष संपल्याची चर्चा रंगली असली तरी, प्रत्यक्षात राजकीय लढाई कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

follow us