मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार; वरपुडकर यांच्यानंतर आता गोरंट्याल भाजपमध्ये जाणार

Marathwada Politics : मराठाड्यात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर परभणीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपत जाण्याचं ठरवलं आहे. त्यामुळं मराठवाड्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडलं आहे.
निर्विवाद वर्चस्व
आगामी स्थानिक स्वशान संस्थांच्या निवडणुका पाहता या दोन्ही नेत्यांचा पक्षत्याग काँग्रेसला धक्का देणारा ठरला आहे. वरपुडकर हे चार वेळा आमदार, एक वेळा खासदार होते. याशिवाय जिल्हा बँकेवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मागील चार दशकापासून जिल्ह्याच्या राजकारण, समाजकारणात ठसा उमटविणारे वरपुडकर म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणातील वलयांकीत नेतृत्व होय.
मराठवाड्यात पावसाची संततधार कायम; जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
विद्यार्थी दशेपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून सुरेश वरपुडकरांचे नेतृत्व विकसीत होत गेले. परभणी जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मंगळवारी मुंबईत त्यांचा भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा झाला, तेव्हा झालेल्या गर्दीमुळे भाजप नेतेही चकित झाल्याचं सांगितलं जातं. या प्रवेशाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वागत केलं.
गोरंट्याल यांनी घेतली बैठक
दुसरीकडे जालन्याचे काँग्रेस नेते, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षाचा रितसर राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविला आहे. त्यांनी मंगळवारी समर्थकांची जालन्यात बैठक घेतली. गोरंट्याल हे येत्या 31 तारखेला भाजपमध्ये जाणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. त्यांचा प्रवेश सोहळा मुंबईतच होईल.