मराठवाड्यात पावसाची संततधार कायम; जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ

Jayakwadi Dam : मराठवाड्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली होती. (Jayakwadi) परंतु, गेल्या तीन दिवसांपासून विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालं आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
छत्रपती संभाजीनगरसह विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती. परिणामी, शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र, २४ जुलैपासून पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. तीन दिवसांपासून सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कुठं रिमझिम तर कुठं दमदार पाऊस पडतो आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे.
तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. सततच्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी म्हणजे ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड मंडळात ९० मि.मी., शेकटा मंडळात ८४ मि.मी. आणि पैठण तालुक्यातील बिडकीन मंडळात ८१ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यात शेतकऱ्यांची तुरीला पसंती; तब्बल ३ लाख ४३ हजार हेक्टर झाली पेरणी
परभणी जिल्ह्यात भीज पाऊस परभणी जिल्ह्यात शुक्रवारी सर्वदूर भीज पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच हलका पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी २२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांत समाधान नांदेड जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासूनच रिमझिम पाऊस पडत आहे.
लातूर जिल्ह्यात सूर्यदर्शन नाही लातूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर सूर्यदर्शन नव्हते. शनिवारी सकाळपासूनच सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे.हिंगोली जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. जालना जिल्ह्यात पिके पिवळी जालना जिल्ह्यात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस चालूच आहे. मंठा तालुक्यातील तळणी, सातोना, आष्टी, घनसावंगी तालुक्यांतील काही गावांत अतीवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.