सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील राडा विधान परिषदेत गाजला; पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाचे आदेश
मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले, त्या संबंधित पोलिसांवर शासनाने कारवाई करून त्यांचे निलंबन करावे.
Suspension orders of police inspectors : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित असा विजय मिळवला आहे. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. मात्र या निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य फुटल्याने राजकीय समीकरणे बदलली. त्यातच मतदानासाठी येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेते तसेच मंत्र्यांची पोलिसांशी जोरदार झटापट झाली.
या झटापटीदरम्यान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेचे पडसाद थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले. विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांच्या अरेरावीचा निषेध करत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि त्यांच्या सोबत असलेल्या सुमारे 100 पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आणि बूटांना मुजरा करत हर्षवर्धन सदगीरने घेतली निवृत्ती
सभागृहात बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, मंत्र्यांना अरेरावी करून जखमी करणारे पोलीस दलाचे प्रमुख तुषार दोषी आणि त्यांच्या सोबतचे १०० पोलीस यांच्यावर कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करावे. आम्ही सुरक्षित आहोत की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्री उदय सामंत आणि गणेश नाईक यांना शासनाच्या वतीने भूमिका मांडण्यास सांगितले.
तसेच त्यांनी स्पष्ट निर्देश देताना म्हटले की, ज्या पोलिसांनी लोकांना आणि मंत्र्यांना धक्काबुक्की केली, तसेच मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले, त्या संबंधित पोलिसांवर शासनाने कारवाई करून त्यांचे निलंबन करावे. यामुळे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत.