वाफळेतील अवैध मुरूम उपसा प्रकरणात मोठी कारवाई; लाच स्वीकारताना तलाठी सुदर्शन जाधवला रंगेहात पकडले
अवैध मुरूम उपशावर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Talathi Sudarshan Jadhav caught red-handed : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वाफळे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मुरूम उपशावर कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाफळे येथील तलाठी सुदर्शन जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाफळे गावाच्या हद्दीत जेसीबी आणि टिपरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा सुरू होता. हा उपसा पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली होती. या प्रकरणात कारवाई करण्याऐवजी तलाठी जाधव यांनी संबंधितांकडून आर्थिक फायदा मिळवण्याचा मार्ग निवडल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदाराकडून कारवाई टाळण्यासाठी आरोप तलाठ्याने तब्बल 33 हजार रुपयांची लाच मागितली होती. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ही रक्कम देण्याचे ठरले. त्यानुसार शुक्रवारी, 27 मार्च रोजी पहिल्या टप्प्यात 23 हजार रुपये आरोपीने स्वीकारले. उर्वरित 10 हजार रुपये शनिवारी, 28 मार्च रोजी देण्याचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदाराने यासंदर्भात सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापाला रचण्याचा निर्णय घेतला. नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत शनिवारी सायंकाळी माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे आरोपी सुदर्शन जाधव हा उर्वरित 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आला. या कारवाईदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आवश्यक पुरावे गोळा केले असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, अवैध मुरूम उपसा आणि त्यावर कारवाई करण्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनीच लाच मागितल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.