‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात

  • Written By: Last Updated:
‘टारझन’ फेम हेमंत बिर्जे दिसणार ‘या’ मराठी चित्रपटात

मुंबई : अनेक अमराठी कलाकारांची पावलं मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने वळत आहेत. तर अनेक जण मराठीत पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात मराठमोळे अभिनेते हेमंत बिर्जे यांनी सोनं केलं आहे. नायक बनून सिनेसृष्टीत दाखल झालेल्या हेमंत यांनी मराठी सिनेसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेतून पदार्पण केलं आहे.

राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सच्या या चित्रपटाची निर्मिती रेशमा मंगेश ठाणगे यांनी केली आहे. येत्या ६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुर्या’ चं दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांनी केलं आहे.

८० च्या दशकात गाजलेल्या ‘टारझन’ चित्रपटात अविस्मरणीय टायटल रोल साकारणाऱ्या हेमंत बिर्जे यांनी ‘सुर्या’ चित्रपटाद्वारे केलेला मराठीपर्यंतचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ते म्हणाले की, मी महाराष्ट्रीय असून, पुण्यात वाढलो असलो तरी कधी मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली नाही. आता ‘सुर्या’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘सूर्या’च्या निर्माता-दिग्दर्शकांनी जेव्हा माझ्याशी संपर्क साधला तेव्हा मला कथा आणि त्यातील कॅरेक्टर खूप आवडल्यानं होकार दिला. यात मी खलनायक साकारला असून, डॉन बनलो आहे. यातील अॅक्शन, अभिनय, नृत्य, दिग्दर्शन, गीत-संगीत, कॅमेरावर्क सारं काही आजवरच्या मराठी चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे.

‘सुर्या’ चित्रपटात प्रसाद मंगेश, रुचिता जाधव, देवशी खंडुरी हे युवा चेहरे दिसणार आहेत. याखेरीज उदय टिकेकर, अखिलेंद्र मिश्रा, गणेश यादव, संदेश जाधव, पंकज विष्णू, हॅरी जोश, अरुण नलावडे, संजीवनी जाधव, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे, प्रदीप पटवर्धन, दिलीप साडविलकर, जसबीर थंडी आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. ६ जानेवारीला हा चित्रपट राज्यभरातील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube