तापमानाने मोडले विक्रम! अकोला सर्वाधिक गरम, विदर्भ-मराठवाड्यात उकाड्याचा तडाखा; शाळा सकाळच्या सत्रात
मराठवाडा आणि इतर भागातही उष्णतेची लाट कायम आहे. जालना, बीड, धाराशिव, परभणी या भागांमध्ये तापमान 48 अंशांच्या आसपास पोहोचल्याची नोंद आहे.
Temperatures break records : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने अक्षरशः कडेलोट गाठल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला असून काही ठिकाणी 45 अंशांचाही टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनानेही काही ठिकाणी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये 44.8, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे प्रत्येकी 44 अंश तापमानाची नोंद झाली. वर्धा आणि नागपूरमध्ये 44.4, तर ब्रह्मपुरीमध्ये 44.7 अंश तापमान नोंदवले गेले. गोंदिया येथे तापमान 43.02 अंशांपर्यंत पोहोचले असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
मराठवाडा आणि इतर भागातही उष्णतेची लाट कायम आहे. जालना, बीड, धाराशिव, परभणी या भागांमध्ये तापमान 48 अंशांच्या आसपास पोहोचल्याची नोंद आहे. नाशिक, संभाजीनगर, मालेगाव, वाशिम, बुलढाणा, सातारा, रत्नागिरी आणि नवी मुंबई या शहरांमध्येही तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम शालेय वेळांवरही झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांच्या वेळांमध्ये बदल करून त्या सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना दुपारच्या तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळू शकेल.
जगदीश मुळीक यांचं राजकीय पुनर्वसन होणार? विधान परिषदेच्या यादीतील नावानं चर्चा रंगल्या
दरम्यान, गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, डोक्यावर कापड किंवा गमछा वापरावा, तसेच भरपूर पाणी आणि शीतपेये घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काहीसा दिलासादायक अंदाजही व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भात 28 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग 30 ते 50 किमी प्रतितास राहू शकतो. तथापि, एकूणच उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उकाडा अधिक तीव्र राहण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठीही हवामान विभागाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पिकांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे, जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा, तसेच नव्या लागवडीसाठी शेडनेटचा वापर करून पिकांचे संरक्षण करावे, असे सांगण्यात आले आहे.