बंडानंतरची पहिली मोठी राजकीय चाल; उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातून फुंकणार रणशिंग

कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे 27 ते 29 जूनदरम्यन मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design 29

Thackeray’s response to the MPs’ rebellion : उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्क्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उतरून पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे 27 ते 29 जूनदरम्यन मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा करणार आहेत. पक्षातून सहा खासदार बाहेर पाडल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत संबंधित मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बंडानंतर देखील शिवसैनिकांनी पक्षाशी निष्ठावंत राहावे आणि संघटना अशी सक्षम करावी, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे आता स्वतः कार्यकर्त्यांमध्ये जाणार असून वाशीम-यवतमाळ, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये सभा, बैठक आणि संघटनात्मक आढावा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच ईशान्य मुंबईतील दौऱ्याचा देखील कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे या मतदारसंघांमध्ये जाणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे, पक्षाची ताकद कायम असल्याचा संदेश देणे आणि पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांविरोधातील राजकीय लढाई अधिक आक्रमक करणे, हे या दौऱ्यामागील प्रमुख उद्दीष्ट मानले जात आहे.

युद्धबंदी फक्त कागदावरच? लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याची केली घोषणा

दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार 27 जून रोजी ठाकरे नागपूरमार्गे यवतमाळ येथे पोहोचतील. सकाळी साडेदहा वाजता यवतमाळ, दुपारी दोन वाजता वाशीम आणि संध्याकाळी चार वाजता हिंगोली येथे त्यांचे कार्यक्रम होणार असून त्यानंतर ते परभणीत मुक्काम करणार आहेत. 28 जून रोजी सकाळी 11 वाजता परभणी येथे तर दुपारी साडेतीन वाजता धाराशिव येथे सभा आणि बैठक होणार आहेत. त्यानंतर त्यांचा मुक्काम छत्रपती संभाजीनगर येथे असेल. 29 जून रोजी सकाळी अकरा वाजता शिर्डी येथे कार्यक्रम पार पाडल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

पक्षाची साथ सोडलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन संघटनात्मक शक्तिप्रदर्शन करण्याची ही उद्धव ठाकरे यांची पहिली मोठी मोहीम मानली जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका, पक्षाची पुनर्बांधणी आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बंडखोरांना थेट राजकीय आव्हान देत पक्ष अजून सक्षम आणि सक्रिय असल्याचा संदेश या दौऱ्यातून देण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे.

follow us