दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर…
नाशिक : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरु असणार आहे.
तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च यादरम्यान होणार आहे. नाशिक विभागात दहावीच्या परीक्षेसाठी दोन लाखांपेक्षा अधिक तर बारावीच्या परीक्षेसाठी दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परिक्षेसाठी बसणार आहेत.
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परिक्षांचं आयोजन केलं जातं. यामध्ये नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या 9 विभागांचा समावेश असतो.
दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकजून जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रक बाबत सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक व शिक्षक संघटनांच्या प्राप्त झालेल्या सूचनांची दखल घेत इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान ही परिक्षा सुरु असणार आहे. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीची परीक्षा दोन मार्चपासून सुरू होऊन 25 मार्चपर्यंत सुरु असणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अधिकृत वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.