वर्षाचा शेवट हा हुडहुडीनं होणार; हवामान खात्याचा इशारा

वर्षाचा शेवट हा हुडहुडीनं होणार; हवामान खात्याचा इशारा

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात थंडी पडत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी दिवसभर थंडीची लाट होती. भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम भारतात ४८ तासांनंतर दांडी कमी होण्याची शक्यता आहे, मात्र या काळात थंडी कायम राहणार आहे.

दरम्यान पुढील 5 दिवस देशाच्या संपूर्ण उत्तर दिशेपासून पश्चिमेपर्यंत दाट धुक्याची चादर पाहायला मिळेल. तर काही ठिकाणी तापमान 7 अंशांवरून थेट 3 अंशावर येईल. ज्यामुळं बहुतांश भागांमध्ये पाण्याचे प्रवाह प्रभावित होतील असंही सांगण्यात आलं आहे. किमान येत्या 10 दिवसांमध्ये तरी थंडीचा कहर कमी होणार नाही, ही बाब हवामान खात्यानं स्पष्ट केली आहे.

थंडीचा तडाखा महाराष्ट्राला देखील बसतो आहे. राज्यातील निफाड, सातारा, नागपूरमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली गेला आहे. तर, मुंबईसह उपनगरीय भागांमध्ये तापमान 20 अंशाहूनही खाली उतरलं आहे. पुढील काही दिवस देशाच्या उत्तरेकडून अशाच शीतलहरी येत राहिल्यास वर्षाचा शेवट हा हुडहुडीनं होणार असंच चित्र पाहायला मिळू शकतं. हवामान खात्याच्या माहितीनीसार नव्या वर्षाची सुरुवात आणि येणाऱ्या वर्षातील काही काळ हा कडाक्याच्या थंडीतच जाऊ शकतो.

हवामान खात्यानुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या डोंगराळ राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत कडाक्याची थंडी पडेल. येथील पारा आणखी घसरणार असून, त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube