बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळ मोकळं करावं; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
ठिय्या आंदोलनामुळं होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोईची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो दखल घेतली आहे. बच्चू कडूं काही आदेश दिले आहेत.
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपुरमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. बच्चू कडू यांच्याकडून कर्जमाफीच्या मागणीसाठी महाएल्गार आंदोलन सुरु करण्यात आलं होतं. आंदोलन 28 तारखेपासून सुरु झाल्यानंतर आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. ठिय्या आंदोलनामुळं होणाऱ्या प्रवाशांच्या गैरसोईची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं सुमोटो दखल घेतली आहे. बच्चू कडू यांनी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरू असलेल्या स्थळावरून बाजूला व्हावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.
बच्चू कडू यांना आंदोलनासाठी 28 ऑक्टोबर साठीची आणि तीही परसोडी गावाजवळच्या मैदानावरील आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती.ती परवानगी 28 तारखेसाठी होती. मात्र, ठिय्या आंदोलन आज म्हणजे 29 तारखेला ही सुरू आहे आणि त्यामुळे लोकांना खास करून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे.परिसरात अनेक रुग्णालये सुद्धा आहेत. अनेक रुग्णांना त्रासाचा सामना करावा लागला आहे, असंही नागपूर खंडपीठाच्या आदेशात म्हटलं आहे.
Video : बच्चू कडूंनी पहिले होकार अन् मग नकार कळवला; फडणवीसांनी मध्यरात्रीची घडामोड सांगितली
पोलीस अधिकाऱ्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू असलेली जागा मोकळी करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसंच नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी आदेशाची पूर्तता केल्यासंदर्भातील रिपोर्ट उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत सादर करावी असेही न्यायालयाने म्हटले आहे. संबंधित क्षेत्राचे पोलीस अधिकारी तसेच महामार्ग पोलिसांनी आदेशाची पूर्तता करावी असंही नमूद करण्यात आलं आहे.
बच्चू कडू यांनी आम्ही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणार नाही, असं म्हटलं. मात्र, जर आंदोलन करायला आलेले सोबतचे लोक आंदोलन सुरू ठेवायचे आहे असे म्हणत असेल तर आम्ही आंदोलन सुरू ठेवू, असं बच्चू कडू म्हणाले. आता लोक न्यायालय आणि विधी न्यायालय यांच्यातला हा संघर्ष आहे. आम्ही न्यायालयाचा अवमान करणार नाही. मात्र, लोक न्यायालयाचे ऐकणे सोडणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
कोर्टाचा आदेश घेऊन पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी बच्चू कडू यांना भेटले. यामध्ये पोलिसांच्या स्पेशल ब्रॅचचे डीसीपी सातव यांचा समावेश होता. दरम्यान, बच्चू कडू यांनी साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दांची औलाद आहे. असं म्हटलं जेल कमी पडेल, अटक करा,आता रामगिरी ताब्यात घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. तर, पोलिस अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या आदेशाची प्रत बच्चू कडू यांना दाखविली.
