राज्यात थंडीची चाहूल अन् चक्रीवादळाचं सावट! 19 नोव्हेंबरला विदर्भात पाऊस, एल निनोमुळे थंडीही कमी?
अशातच बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या 'अकबन' चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
The onset of winter and the looming threat of a cyclone in the state : महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. पहाटे आणि सकाळच्या सुमारास उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत गारठा जाणवू लागला आहे. तर दुसरीकडे दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम असल्याने नागरिकांना दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात तापमानाचा पारा घसरू लागल्याने हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे. अशातच बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या ‘अकबन’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून 19 नोव्हेंबरच्या आसपास विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील डोंगराळ भागात सध्या पाऊस आणि बर्फवृष्टीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, आगामी काळात उत्तर भारतात पुन्हा सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडील भागात पाऊस आणि बर्फवृष्टीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. याच दरम्यान उत्तरेकडून वाहणारे थंड वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत असल्याने राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
पुणे रन फॉर युनिटीवरून राजकीय रणकंदन! 50 लाखांच्या खर्चावरून धंगेकरांचा मोहोळांवर हल्लाबोल
या संभाव्य चक्रीवादळाला ‘अकबन’ असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाच्या हालचालींवर हवामान विभागाचे लक्ष असून ते आंध्र प्रदेशच्या आसपास प्रभाव दाखवू शकते. काही अंदाजांनुसार, या वादळाची दिशा म्यानमारच्या दिशेने असण्याची शक्यता आहे. याशिवाय अरबी समुद्रातही सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत असल्याने समुद्रातील हवामानातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत वादळाची दिशा आणि त्याची तीव्रता यावर महाराष्ट्रातील हवामानाचे चित्र अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचा कोणताही विशेष अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. मात्र, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटे आणि सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या परिसरात तापमान कमी होत असल्याने थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे. काही ठिकाणी नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचाही आधार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, दुपारच्या वेळी सूर्याचा प्रभाव कायम असल्याने तापमानात वाढ होते आणि उकाडाही जाणवतो. त्यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका, असे संमिश्र वातावरण राज्यात अनुभवायला मिळत आहे.
भारताकडे 2029 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद; ICC कडून 2035 पर्यंतचे वेळापत्रक जाहीर
हवामानाच्या अंदाजानुसार, 19 नोव्हेंबरच्या आसपास चक्रीवादळाचा संभाव्य लॅण्डफॉल होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे विदर्भातील काही भागांत पाऊस पडू शकतो. मात्र, चक्रीवादळाने आपली दिशा बदलल्यास विदर्भातील पावसाचे चित्रही बदलू शकते. त्यामुळे या काळात शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या अंदाजाकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
यंदाच्या हिवाळ्याबाबतही हवामान तज्ज्ञांनी महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मागील वर्षांसारखी कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. एल निनोचा प्रभाव मार्च-एप्रिल 2027 पर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याने हिवाळ्यातील तापमानावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात थंडीचा जोर किती राहणार आणि विदर्भात चक्रीवादळामुळे प्रत्यक्षात पाऊस पडणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.