आमची वसई संस्थेचा प्रमुख असल्याचा दावा, पण प्रत्यक्षात महिलेला जाळ्यात ओढत अत्याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 100

Torture while dragging a woman into a trap : वसईतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचे सांगत एका 35 वर्षीय विवाहित महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात अत्याचाराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपासासाठी ते पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या घटनेमुळे वसईसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित महिला पुण्यात वास्तव्यास असून 2023 साली तीही ओळख फेसबुकच्या माध्यमातून ऋषिकेश वैद्य याच्याशी झाली. आमची वसई या संस्थेचा प्रमुख असल्याचे सांगत त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आणि अध्यात्म शिकवण्याच्या नावाखाली महिलेचा विश्वास संपादन केला. सुरूवातीला अध्यात्मिक मार्गदर्शन, साधना आणि मानसिक समाधान देण्याचे आश्वासन देत त्याने तिच्याशी संवाद वाढवला. हळूहळू हा संवाद वैयक्तिक झाला आणि त्याने तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली.

डिसेंबर 2023 मध्ये वैद्य पुण्यात आला. त्या वेळी त्याने मी महादेवाचा अवतार आहे, असा दावा करत महिलेची पूर्णपणे दिशाभूल केली. धार्मिक श्रद्धा आणि अध्यात्माचा आधार घेत त्याने तिला मानसिकदृष्ट्या आपल्या प्रभावाखाली आणले. त्यानंतर पुण्यातील मांजरी परिसरातील एका लॉजमध्ये तिला नेण्यात आले. तेथे तिला पाण्यातून गुंगीकारक औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिला मानसिकदृष्ट्या खचली होती आणि भीतीमुळे तिने तात्काळ तक्रार केली नाही.

दरम्यान आरोपीने तिचे नकळत आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढले. याचाच आधार घेत त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तू माझी पार्वती आहेस, असे सांगत धार्मिक भावनांचा गैरवापर केला. या भीतीमुळे आणि समाजातील बदनामीच्या दबावामुळे महिला आरोपीच्या संपर्कात राहण्यास भाग पडली. तो वेळोवेळी तिला भेटण्यास भाग पाडत होता.

महसूल विभागात खळबळ! 13 अतिगंभीर प्रकरणांत दोषी अधिकाऱ्यांना सक्तीची रजा

महिला वसईत गेल्यानंतर देखील आरोपीने तिचा पाठपुरावा सुरूच ठेवला. मे 2025 मध्ये वसईतील एका हॉटेलमध्ये तिला बोलावून पुन्हा एकदा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न कारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सर्व घटनांमुळे महिला महिला प्रचंड मानसिक तणावाखाली होती. दरम्यान नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेने धाडस दाखवले. समाजात अशा घटनांविरोधात आवाज उठू लागल्याने तिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात बोलण्याची ताकद मिळाली. तिने हा संपूर्ण प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून माणिकपूर पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपीविरोधात अत्याचार, फसवणूक आणि धमकी यांसारख्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेले डिजिटल पुरावे, सोशल मीडिया चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ यांची तपासणी केली जात आहे. आरोपीने आणखी कोणाला अशा प्रकारे फसवले आहे का, याचा देखील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे समाजात पुन्हा एकदा भोंदू बाबांच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. श्रद्धेचा गैरवापर करून महिलांना आणि सामान्य नागरिकांना फसवणाऱ्या अशा स्वयंघोषित धर्मगुरूंच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. नागरिकांनी देखील अशा व्यक्तींपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

follow us