धनंजय मुंडेंच नाव घेत उत्तम जानकरांचा मोठा आरोप; म्हणाले, वाल्मिक कराडांचा करता करविता….
Uttam Jankar on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा निकवर्तीय असल्याने राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. (Uttam Jankar) अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले जानकर?
बीड मस्साजोय येथील प्रसंग अतिशय हृदयद्रावक आहे, अतिशय भयानक अशी ती घटना घडली आहे. मी त्या ठिकाणी गेलो होतो. कुटुंबासोबत भेट घेतली आहे. तिथे असणाऱ्या दोनशे तीनशे लोकांसोबत मी बोललो. त्या ठिकाणच्या परिस्थितीची मी माहिती घेतली. बीडमध्ये अतिशय भयानक गुंडाराज आहे. जवळपास दोन ते अडीच हजार रिव्हॉल्वरचं लायसन्स आहे, कोणी एखादा टिप्पर वाला असेल त्याचा उद्घाटन करायचा असेल तर हवेत गोळीबार केले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असेल तर तरी गोळ्या झाडल्या जातात, अशी परिस्थिती बीडमध्ये आहे असं जानकर म्हणाले.
जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील
या प्रकरणात दोषी आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मीक कराड ज्यांच्यासाठी खून करत होता, वाल्मीक कराड यांच्यासाठी खंडणी गोळा करत होता, त्याच्यासाठी हा मलिदा गोळा करत होता, तो कोण आहे त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे. इतकं सगळं करण्यामागे कारणच इतकं होतं कोणालातरी नेवून द्यायचं, या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला, त्याला माझाही पाठिंबा आहे. त्याच्या पुढच्या लढाईमध्ये देखील मी त्यांच्यासोबत असेल. वाल्मीक कराड याला अटक करावी, त्याला तात्काळ अटक झाली नाही, तर या राज्यांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघतील असंही पुढे उत्तमराव जानकर म्हणालेत.
त्याशिवाय कराड झोपत नव्हता
धनंजय मुंडे कराडचा करता करविता आहे, या सर्व प्रकरणामागे त्यांनी ताकद दिली. तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे. कोणताही राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतके खून, इतक्या मारामाऱ्या, इतकी खंडणी, करू शकत नाही, दररोज एक कोट रुपये घरी घेऊन गेल्याशिवाय वाल्मिक कराड झोपत नव्हता अशी चर्चा बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना मध्ये आहे, 1000 रुपये जरी कमी असले तरी कोणाच्यातरी हात पाय मोडून त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखाद्याचा खून करून ये इतका चिल्लर काम करायचा. एक हजार रुपये कमी असले तरी त्याला झोप नाही यायची असंही ते यावेळी म्हणालेत.
हा प्रकार या राज्यामध्ये घडत होता, हे एका दिवसांमध्ये घडलेलं नाही याच्यामध्ये राजकीय ताकद आणि वरदहस्त असल्याशिवाय असा घडू शकत नाही असेही पुढे उत्तमराव जानकर म्हणालेत. तर राज्य सरकारने याकडे कानाडोळा केला नाही, तर राज्य सरकारने हे तयार केलेले गुंड आहेत. आज त्यांच्यावर कारवाई करायची उद्या गडबड होईल, सत्ता जाईल आणि फक्त ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांनाही सत्ता मिळालेली आहे. लोकशाहीची सत्ता नाही त्यामुळे राज्य सरकारच्या ताकदीशिवाय हे घडू शकत नाही असे पुढे ते म्हणालेत.