महापालिकेच्या अधिकाऱ्याकडं सापडली तब्बल ८ कोटींची कॅश; वाचा, ईडीच्या धाडीत काय सापडलं?

Y. S. Reddy Corruption Case : वसई विरार शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागाचा उपसंचालक वाय. एस. रेड्डी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मे 2016 रोजी ठाणे लाचलुचपत (Corruption) विभागाच्या कारवाईत त्याच्याकडून वसई आणि हैदराबाद येथील घरी कोट्यवधींचं घबाड सापडलं होतं. आता तब्बल नऊ वर्षानंतरही पुन्हा 8 कोटींची कॅश आणि 23 कोटींचे दागिण्यांचे घबाड सापडलं.
वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापेमारी करत ईडीला त्याच्या घरात करोडोचं घबाड सापडलं. त्याच्या या घरात ईडीला 8 कोटी 6 लाखाची रोकड आणि 23 कोटी 25 लाख रुपये किमतीचं सोनं, दागिने, हिरे मिळाले आहेत. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020 पासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर अधिकारी किती गब्बर झालेत यांच वास्तव समोर आलं आहे. नालासोपारा येथील 41 अनधिकृत इमारती घोटाळा प्रकरणी ईडी मार्फत चौकशी सुरु आहे. ईडीने बुधवारी 13 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यात संबधीत बिल्डर, दलाल आणि पालिकेचे अधिकारी यांचा समावेश होता.
Video : आर्थर रोड तुरुंगाला संजय राऊत ;नरकातला स्वर्ग का म्हणाले?; पाहा लेट्सअपची खास मुलाखत
मे 2016 रोजी शिवसेनच्या तत्कालीन नगरसेवकाला 25 लाखाची लाच देताना भ्रष्ट आणि वादग्रस्त अशा नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी याला ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी रेड्डीच्या वसईतील वसई विकास सहकारी बँकेतील लॉकरमधून 34 लाख रुपयांची रोकड आणि दोन किलो सोने हाती लागले होते. तर हैदराबाद येथील घरात 92 लाख रुपये रोख आणि चार किलो सोने सापडले होते. यावेळी रेड्डीला निलंबित करण्यात आलं होतं. मात्र पालिकेनं त्याला पुन्हा 2017 साली सेवेत घेतलं.
आता तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा रेड्डीकडे कोट्यवधींचे घबाड सापडलं आहे. त्यामुळे अशा लबाड अधिकाऱ्यांच्या मागे किती सक्षम यंत्रणा राबते हे दिसून येते. रेड्डी हा सिडकोचे अधिकारी आहे. त्याला 2010 पासून प्रतिनियुक्तीवर वसई विरार पालिकेत पाठवले होते. पालिकेने 2012 रोजी महासभेच्या मान्यतेनुसार महापालिकेने त्यांना उपसंचालक नगररचना या पदावर नियुक्त केलं होतं.