फरार झालेल्या वसंत देशमुखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान

  • Written By: Published:
फरार झालेल्या वसंत देशमुखच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान

Vasant Deshmukh Arrested :संगमनेर तालुक्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संवाद सभेच्या मंचावरून ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत अत्यंत खालच्या थराला जात वक्तव्य केलं. त्यानंतर नगर जिल्ह्यात गेली दोन दिवसांपासून एकच खळबळ उडालेली आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आणि थोरात समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामध्ये वसंतराव देशमुखांना अटक करा ही मुख्य मागणी या आंदोलकांची आहे. अखेर आज देशमुख यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जयश्री थोरातांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वसंतराव देशमुख यांना अटक करावी अशी मागणी थोरात समर्थकांच्या वतीने केली जात होती. देशमुख हे फरार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. रविवारी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसंत देशमुख यांना पुणे येथून ताब्यात घेतलं आहे.

Video: जयश्री थोरात रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून; अखेर पहाटे वसंत देशमुखांवर गुन्हा दाखल

वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे स्वतः अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देत संबंध प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पथके तयार केली होती.

जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक अशा घटना घडल्या आहेत. हे वक्तव्य करणारे वसंत देशमुख हे फरार होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. आता स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना नगर जिल्ह्याबाहेरुन ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आता त्यांना लवकरच संगमनेर येथे आणलं जाईल. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती आहे. तसंच, त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

मी जयश्री यांना ताई म्हणून संबोधतो, महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. भाषणादरम्यान मी त्यांना दोनवेळा थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. महायुतीच्या कोणत्याही व्यक्तीचा त्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही, आम्ही त्याचा निषेध करतो. अशाप्रकारे कोणी नेता बोलत असले, तर त्याला पक्षात ठेवलं जाणार नाही, असंही सुजय विखे म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube