ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे निधन; मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातून हळहळ व्यक्त

अरविंद पाटकर यांनी तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली होती.

  • Written By: Published:
Untitled Design (334

Veteran publisher Arvind Patkar passes away : मनोविकास प्रकाशनचे संचालक आणि ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे आज पहाटे दोन वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता पुण्यातील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अरविंद पाटकर यांनी तरुण वयातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली होती. गिरणी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.

दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगार संपाच्या काळात पक्षांतर्गत मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर काही सहकाऱ्यांसह त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षातून बाहेर पडल्यानंतर उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला. त्या टप्प्यावर अभिवन प्रकाशनचे वा. वि. भट यांनी त्यांना मोलाची मदत केली. पक्षाच्या सभा आणि आंदोलनांमध्ये पुस्तक विक्रीचा अनुभव पाटकरांना आधीपासूनच होता. याच अनुभवाच्या बळावर त्यांनी ‘विकास बुक सेंटर’ या नावाने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला माटुंगा येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाबाहेर, त्यानंतर नायर, केईएम, जेजे, सायन अशा मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये त्यांनी पुस्तक विक्री केली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसंदर्भात आज होणार निर्णय; पुढे ढकलण्याची शक्यता

पुस्तक प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा वाचकांशी थेट संवाद वाढत गेला. मुंबई महानगरपालिकेचा जिमखाना, ओल्ड कस्टम हाउस, रिझर्व्ह बँकेची इमारत अशा विविध ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन केले. अखेर 4 एप्रिल 1984 रोजी आमदार निवासाच्या आवारात मनोविकासचे पहिले अधिकृत दुकान सुरू झाले. ‘मनोविकास प्रकाशन’ हे नावही एका सहजसुंदर क्षणातून साकार झाले. कोकणातील कुडाळ येथे पुस्तक प्रदर्शनासाठी गेले असताना शेजारी राहणाऱ्या बबन पाटकर यांनी ‘विकास बुक सेंटर’ हे नाव सर्वसामान्य वाटते असे सांगत त्यामागे ‘मनो’ जोडण्याची सूचना केली. त्यातूनच ‘मनोविकास प्रकाशन’ या नावाचा जन्म झाला.

1985 मध्ये वा. वि. भट यांच्या पाठिंब्याने मनोविकास प्रकाशनचे पहिले पुस्तक ‘शाहीर’ प्रकाशित झाले. त्यानंतर वैचारिक, सामाजिक आणि साहित्यिक पुस्तकांच्या माध्यमातून मनोविकासने स्वतंत्र ओळख निर्माण केली. 2005 पासून अरविंद पाटकर पुण्यात स्थायिक झाले आणि तेथूनच त्यांनी प्रकाशन कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेले.

follow us