अमरावती जिल्हा बँकेत ‘एका’ मतासाठी ‘दोन’ कोटी : सत्ता हिरावलेल्या बच्चू कडूंवर यशोमती ठाकूरांचे आरोप

अमरावती जिल्हा बँकेत ‘एका’ मतासाठी ‘दोन’ कोटी : सत्ता हिरावलेल्या बच्चू कडूंवर यशोमती ठाकूरांचे आरोप

मुंबई : अमरावती जिल्हा बँकेत सत्ताबदल करण्यासाठी आणि काँग्रेसचे संचालक फोडण्यासाठी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार केला असल्याचा आरोप, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. त्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस सुरु होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी फुटलेल्या संचालकांवरही भाष्य केलं. (Amravati District co-operative bank chairman and vice chairman election Yashimati Thakur make allegations on Bacchu Kadu)

यशोमती ठाकूर म्हणाल्या, काल अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक झाली. जवळपास 17 ते 20 वर्षांपासून ही जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात होती. पण काल आमची तीन मत फुटली. पण ही तीन मत फोडण्यासाठी खोक्यांचा इफेक्ट अमरावती जिल्ह्यात दिसला. म्हणजे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या भावनांसोबत हा जर खेळ होणार असेल तर शेतकरी माफ करणार नाही.

जे निवडून आले ते असं म्हणतात आम्ही शेतकऱ्यांची पोरं, असं अन् तसं. पण एवढे पैसे म्हणजे दीड अन् दोन कोटी एका मतासाठी कुठून येतात? आमची हिंमत होत नाही. आम्ही पण खूप सारं राजकारण लहानपासून बघितलेलं आहे, सत्ता बघितली आहे. या प्रकारची उतमात आम्ही कधीही बघितलेली. जे संचालक फुटले त्यांना शेतकरी कधीही माफ करणार नाही. खोक्यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत आहे, असंही आमदार ठाकूर म्हणाल्या.

अमरावती जिल्हा बँकेत बच्चू कडूंचा अध्यक्षपदी विजय :

अमरावती जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या बहुमतातील पॅनेलला धक्का देत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी बाजी मारली आहे. बच्चू कडू यांची अध्यक्षपदी तर अपक्ष संचालक अभिजित ढेपे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पूर्ण बहुमत आणि सर्व परिस्थिती काँग्रेससाठी अनुकूल असतानाही काँग्रेसचा हा पराभव यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसची 3 मत फुटली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube