Letsupp Special : पक्ष बदलले पण वैर नाही! केदार विरुद्ध देशमुख संघर्षाची धार तीव्र होणार?
सालं होतं 2009. विधानसभा निवडणुका चालू होत्या. राज्यातील विविध मतदारसंघामध्ये चुरशीचे वातावरण होते. एकमेकांना आस्मान दाखविण्यासाठी डावपेच आखले जात होते. यात सगळ्यात चर्चेची निवडणूक ठरत होती ती सावनेर विभानसभा मतदारसंघाची. या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख भाजपमधून काँग्रेसचे बडे नेते सुनील केदार यांना आव्हान देत होते. (ex MLA Ashish Deshmukh vs Congress leader Sunil kedar conflict history)
सुनील केदार यांना निवडणूक जड जाणार हे प्रचाराच्या अखेरच्या दिवसांमध्ये मतदारसंघातील वातावरणावरुन लक्षात येत होते. झालेही तसेच. केदार यांचा अवघ्या ३ हजार मतांनी विजय झाला. त्यापूर्वी 1995 मध्ये केदार यांनी 21 हजार मतांनी विजय मिळवला होता. तर 2004 मध्ये 14 हजार मतांनी. पण 2009 मध्ये सुनील केदार यांना आशिष देशमुख यांनी विजयासाठी घाम फोडला.
2009 ते 2003 या 14 वर्षांच्या कालखंडात अनेक घडामोडी घडून गेल्या. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. पण सावनेरमध्ये दोन गोष्ट कायम राहिल्या. एक केदार विरुद्ध देशमुख यांच्यातील संघर्ष आणि दुसरी देशमुख यांचे वचपा काढण्याचे स्वप्न. आता आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि यातून ते पुन्हा एकदा सुनील केदार यांचा पराभव करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
देशमुख विरुद्ध केदार संघर्ष :
देशमुख विरुद्ध केदार यांच्यातील संघर्षाला 1995 मधील विधानसभा निवडणुकीची किनार आहे. 1985 आणि 1990 या विधानसभा निवडणुकीत सावनेरमधून रणजीत देशमुख आमदार होते. रणजीत देशमुख म्हणजे काँग्रेसमधील बडे नेते. काँग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांना मागे सारुन ते प्रदेशाध्यक्ष झाले होते. मात्र या बड्या नेत्याच्या विरोधात केदार यांनी शड्डू ठोकला.
1995 मध्ये काँग्रेसने सुनील केदार यांना तिकीट दिले नाही. पण तेही मागे हटले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली. तरुण तडफदार सुनील केदार देशमुखांशी लढले, भिडले आणि जिंकलेही. देशमुख यांचा तब्बल 21 हजार मतांनी पराभव झाला. इतकंच नाही तर त्या निवडणुकीनंतर शिवसेना – भाजप युती सरकारमध्ये ते मंत्रिसुद्धा झाले. 1995 मध्ये ते ऊर्जा, बंदर आणि परिवहन राज्यमंत्री होते.
त्यानंतर रणजीत देशमुख वयोमानामुळे राजकीय प्रवाहापासून लांब झाले. मध्यंतरीच्या काळात त्यांनी काँग्रेसही सोडली. मात्र केदार यांच्याविरुद्धचं त्यांच्यातील वैर कायम राहिलं. अनेकदा ते केदार यांच्यावर टीका करताना दिसून आले. आता केदार यांच्याविरुद्धचा हाच वचपा काढण्यासाठी आशिष देशमुख प्रयत्नशील आहेत. 2009 मध्ये प्रयत्न करुन बघितला मात्र त्यात त्यांना अवध्या 3 हजार मतांनी अपयश आलं. आता 2024 मध्ये ते या संधीसाठी पुन्हा प्रयत्नशील असणार आहेत.
आशिष देशमुख यांचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण :
मूळचे काँग्रेसी असलेले देशमुख भाजपमध्ये गेले. 2009 मध्ये सावनेरमधून तर 2014 मध्ये भाजपने त्यांना काटोलमधून तिकिट दिले. यात 20014 मध्ये त्यांनी काका अनिल देशमुख यांना पराभूत करुन पहिल्यांदा विधानसभाही गाठली. मात्र काही वर्षांतच देशमुख यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विदर्भ विकासाच्या मुद्द्यावर मतभेद झाले. त्यातून त्यांनी फडणवीस सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते भाजपामध्ये एकाकी पडत गेले. अखेर ऑक्टोबर २०१८ मध्ये त्यांनी आमदारकीचा अन् भाजपचा राजीनामा दिला. त्यानंतर वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आता पुन्हा एकदा ते भाजपवासी होणार आहेत. या निमित्ताने देशमुख यांचे राजकारणातील एक वर्तुळ पूर्ण होणार आहे.