नागपूर पदवीधरसाठी भाजपची ‘टाईट फिल्डिंग’; बंडखोर सोलेंना रोखण्यासाठी रणनिती ठरली
Nagpur Divisional Graduate Constituency Election : सोले यांच्या बंडखोरीमुळे या बंडखोरीचा पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी भाजपची रणनिती
Nagpur Divisional Graduate Constituency Election : नागपूर विभागीय पदवीधर (Nagpur Divisional Graduate Constituency) मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. हा मतदारसंघ भाजपचा (BJP) बालेकिल्ला राहिलेला आहे. पण मागील निवडणुकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारी (Abhijit Wanjari) यांनी हा मतदारसंघ खेचून आणला आहे. ही सल भाजप नेत्यांचा मनात आज आहे. पुन्हा मतदारसंघ खेचून आणण्यासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना रिंगणात उतरविले. पण एकेकाळी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे व नागपूर माजी महापौर अनिल सोले (Anil Sole) यांनी बंडखोरी केलीय. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय राहिलेले आहे. मजबूत उमेदवार असून, पक्षातील काही नेते त्यांचा पाठीशी आहे. त्यातून भाजपमध्ये मतविभाजन झाल्यास काँग्रेसला फायदा होऊ शकते हे चिंता भाजपसमोर आहे. त्यामुळे सोले यांना रोखण्यासाठी भाजपने तगडी फिल्डिंग लावलीय.
सोले यांच्या बंडखोरीमुळे या बंडखोरीचा पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला फटका बसू नये, यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी केलीय. निवडणुकीची जबाबदारी अनुभवी नेत्यांकडे सोपवण्यासोबतच सहाही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलीय.
बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची रणनीती
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केलीय. राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीची मुख्य जबाबदारी स्वीकारलीय. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपविण्यात आलाय. तर आमदार संजय भेंडे, माजी आमदार संदीप जोशी, राज्यमंत्री पंकज भोयर आणि आमदार परिणय फुके यांच्यासह अन्य नेत्यांवरही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात. सुधीर दिवे आणि गिरीश देशमुख हे निवडणूक सह-प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि प्रचाराचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी सहाही जिल्ह्यांमध्ये मतदारसंघनिहाय निवडणूक प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. बंडखोर उमेदवाराला पक्षांतर्गत मदत मिळण्याची शक्यता रोखण्याबरोबरच अधिकृत उमेदवाराच्या बाजूने संघटनात्मक ताकद उभी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
अंबानींच्या समर्थकांचे युक्तिवाद हास्यास्पद; एलन मस्क यांचा पुन्हा टोला
अनिल सोले यांच्या उमेदवारीने भाजपमध्ये अस्वस्थता
एकीकडे भाजपने निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रिय केलीय. पण दुसरीकडे पक्षातील अंतर्गत मतभेदही समोर येत आहेत. माजी आमदार गिरीश व्यास यांनी अनिल सोले यांच्यासाठी आपले कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्याने वेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपचे कोषाध्यक्ष राजेश बागडी यांनीही सोले यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली. त्यामुळे पक्षातील काही नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्ट माजी आमदार संदीप जोशी यांच्याकडे सह-प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत. या निवडणुकीतील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अनिल सोलेंनी भाजप नेत्यांची आतून मदत ?
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अनिल सोले यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आमदार संजय भेंडे आणि माजी आमदार गिरीश व्यास यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. कार्यक्रमाचा खर्च मध्य नागपूरच्या आमदाराने उचलल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर सोले यांनी बंडखोरी केल्याने या जुन्या घडामोडींची चर्चा पुन्हा सुरू झालीय. पक्षातील काही नेत्यांच्या संभाव्य भूमिकेबाबत भाजपमध्ये संशयाचे वातावरण असल्याचे एका पक्षनेत्याने सांगितले. त्यामुळे निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासोबतच प्रचाराची जबाबदारी स्पष्टपणे विभागण्यात आली आहे.
तिरंगी लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपमधून बंडखोरी करून मैदानात उतरलेले अनिल सोले यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. सोले यांच्या बंडखोरीमुळे मतांचे विभाजन किती होते आणि त्याचा अधिकृत उमेदवाराच्या निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपने उभारलेली मजबूत निवडणूक यंत्रणा, पक्षातील नाराजी आणि बंडखोर उमेदवाराला मिळणारा संभाव्य पाठिंबा या तीन बाबी या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील ही निवडणूक केवळ उमेदवारांमधील लढत न राहता भाजपच्या संघटनात्मक ताकदीचीही परीक्षा ठरणार आहे.