साताऱ्यातील देशसेवेचं ‘वैभव’ हरपलं! स्वतः होते सैन्यात तर पत्नी पोलीस दलात; चिमुकलीचं नावही ‘हिंदवी’
सातारा : लडाखमध्ये काल (शनिवार) भारतीय सैन्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सैन्याचे 9 जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील सुपुत्रालाही वीरमरण आले आहे. साताऱ्याचे जवान वैभव भोईटे या दुर्घटनेत शहीद झाले आहेत. शहीद जवान वैभव भोईटे हे मूळचे हिंगणगाव (ता. फलटण) येथील असून राजाळे (ता. फलटण) येथे स्थायिक होते. (Army Man Vaibhav Bhoite from satara has been martyred in an army vehicle accident in Ladakh)
देशसेवेचं ‘वैभव’ :
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव भोईटे फलटण तालुक्यातील राजाळे येथे स्थायिक होते. वैभव भोईटे यांचे माध्यमिक शिक्षण राजाळेमधीलच जानाई हायस्कूल इथे झाले तर फलटणमधील मुधोजी कॉलेजमध्ये पुढील शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण सुरु असतानाच ते सैन्य भरतीसाठी प्रयत्न करत होते.
भोईटे यांच्या कुटुंबातच देशसेवेचे वसा आणि वारसा दिसून येतो. त्यांचे काका विलास भोईटे हे तुरुंग अधिकारी होते. तर स्वतः वैभव हे सैन्यात होते. याशिवाय त्यांच्या पत्नी प्रणाली भोईटे याही सातारा पोलीस दलात कार्यरत असून सध्या त्या दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
वैभव भोईटे यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दीड वर्षांची मुलगी, दोन बहिणी (विवाहित), भाऊ व भावजय असा परिवार आहे. शहीद जवान वैभव भोईटे यांचे पार्थिव मंगळवारी गावी येणार असल्याचे सांगितले जात आहे.
कसा झाला अपघात?
लडाखमध्ये शनिवारी सायंकाळी भारतीय लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात झाला. कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर वाहन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि उर्वरित 8 जवान आहेत.
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एएलएस वाहन लेहहून न्योमाकडे जात होते. संध्याकाळी 5:45 ते 6:00 च्या सुमारास ते कायरीच्या 7 किमी आधी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पावणे पाचच्या सुमारास दरीत कोसळले. गाडीत लष्कराचे 10 जवान होते. यापैकी नऊ जणांना वीरमरण आले आहे, तर एकजण जखमी झाला.