डॉ. विजय मकासरे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द
अहमदनगर : श्रीरामपूर शहर पोलीसांनी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधितज्ञ डी. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी केल्यामुळे डॉ. विजय मकासरे यांनी सदर पोलीसांविरुध्द लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
त्याची पडताळणी करणेकामी लाच लुचपतच्या अधिका-यांनी सापळा रचून पंचासह डॉ. मकासरे यांना त्यांच्या फॉरच्युनर गाडीमध्ये पोलीस स्टेशन समोर पाठविले होते. परंतु सापळा लावल्याचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी रिचर्ड गायकवाड या पोलीस कर्मचान्याला पाठवून डॉ. मकासरे यांची गाडी पोलीस स्टेशनला घेऊन येण्याचे सांगितले.
परंतु डॉ. मकासरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका- यांच्या सांगण्यावरुन त्यांची गाडी बेलापूर रोडनी नेली. त्यानंतर बहिरट व पोलीस कर्मचारी किशोर जाधव यांनी खाजगी गाडीने डॉ. विजय मकासरे यांच्या गाडीचा पाठलाग करुन यांच्या गाडीला गाडी आडवी लावली. हे चालू असतांनाच लाचलुचपत विभागाचे अधिकारी त्याठिकाणी आले व त्यांनी डॉ. विजय मकासरे यांची सुटका केली.
लाचलुचपतच्या अधिका-यांनी त्यांची ओळख पो. नि. श्रीहरी बहिरट यांना करुन दिली व हा सर्व प्रकार आमच्या सांगण्यावरून झाला आहे. तरी डॉ. विजय मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल करू नका असे सांगितले. तरी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी मकासरे यांचे विरोधात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणात न्यायालयाने पुरावे तपासले असता बहिरट यांनी सदरच्या गुन्हयाचा चुकीचा पध्दतीने तपास केल्याच निष्पण झाले. त्यानुसार मकासरे यांच्या विरुध्दचा गुन्हा न्यायालयाने रदद् केला आहे.