Lok Sabha Election : ‘महायुती’ की ‘महाविकास आघाडी?’ राजू शेट्टींनी एकदाचं क्लिअरच केलं
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर शेट्टी यांनी आज स्पष्ट शब्दांत उत्तर देऊन टाकले. मी स्वतंत्र लढणार आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
वाळवा तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. माझी निवडणूक अथवा उमेदवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी आघाडीकडून संपर्क सुरू आहे. दोघांकडून सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला जात आहे. मात्र मी कुणाबरोबरच जाणार नाही. मला त्यांच्यात रस नाही. मी स्वतंत्र लढणार आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
मला राजकारणात करिअर करायचे नाही. जे काही करायचे होते ते आता करून झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केली होती आणि मी आजही त्यावर ठाम आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.