Radhakrishna Vikhe Patil : काम वेळेत न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार
Minister Radhakrishna Vikhe inspected the works of Nilwande canals : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव तालुक्यातील जिरायत भागाला वरदारन ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) कालव्याची संगमनेर तालुक्यातील काही कामे रखडलेली आहेत. निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची काम ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपुर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या तसेत काम वेळेत न करणाऱ्या ठेकेदारांना आता काळ्या यादीत टाकण्याचे सुतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी केले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची पाहाणी केली. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे, कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री, निर्मळ वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतले.
निमगावजाळी येथील कालव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात झालेला विलंब आणि दिसून आलेल्या निष्काळजीपणाची मंत्री विखेंनी यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल आणि जलसंपदा विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी या पाहाणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
बहतांश गावातील कालव्यांची काम घेतलेल्या ठेकेदारांनी अर्धवट केली आहेत. अनेक ठिकाणी काम अद्यापही सुरू नाहीत. या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने मुदतवाढ घेतली. तरीही कामाची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून प्रलंबित काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
यावेळी ठेकेदारांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेली काम पूर्ण करत नसल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून अशा ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांना कामाकरीता मुदतवाढ का देता, असा सवालही अधिकाऱ्यांना विचारला. या प्रकल्पात ठेकेदार अडथळे निर्माण करणार असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत टाका, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, निळवंडे कालव्यांची काम पूर्ण करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याने कालव्यांची काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.