Dhangar reservation : धनगर आरक्षणाचे भाजपकडून केवळ आश्वासन, मात्र पूर्तता नाही; प्राजक्त तनपुरेंची टीका
अहमदनगर – राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाज आरक्षणाच्या लढाईत उतरला. यासाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने देखील सुरु आहे. यातच पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षण (Dhangar reservation) मिळावे यासाठी धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांची राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी भेट घेतली. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तनपुरें यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणासोबतच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात गेल्या १५ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो धनगर बांधव चौंडीत दाखल होत आहेत. याशिवाय, महाराष्ट्रभर आंदोलने आणि उपोषणे सुरू आहेत. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग) आरक्षण मिळावे यासाठी धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत. आमदार तनपुरे यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.
Justin Trudeau : जस्टिन ट्रूडो अन् वाद विवाद; पंतप्रधान असतानाच घेतला होता घटस्फोट…
तनपुरे यांनी सांगितले की, 2014 च्या निवडणुकीत भाजपने धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण करण्यासाठी राज्य किंवा केंद्राकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याबद्दल उपोषणकर्त्यांनी खंत व्यक्त केली. धनगर समाजाला देखील आदिवासी समाजाप्रमाणे घरकुल व इतर महत्वाच्या योजना पुरवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी धनगर समाजाच्या मागण्यांकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
आंदोलकांची तब्येत बिघडली
चौंडीत धनगर समाजाचे माजी मंत्री बाळासाहेब दोडातळे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे. या उपोषणाला अण्णासाहेब रूपनवार हे उपोषणाला बसले. मात्र उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना प्रथम अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी चौंडी येथील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दोन दिवसांत या प्रश्नावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची मुदत काल संपली. चौंडीतील आंदोलन हे अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे आता हे आंदोलन काय स्वरूप धारण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.