शरद पवार हे मराठा समाजाला भडकावताय; राधाकृष्ण विखेंचा गंभीर आरोप

  • Written By: Published:
शरद पवार हे मराठा समाजाला भडकावताय; राधाकृष्ण विखेंचा गंभीर आरोप

Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यावरून आता सत्ताधारी व विरोधकांनी एकमेंकावर वार करण्यास सुरूवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंदोलनस्थळाला भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर पवारांवर आता सत्ताधारी नेत्यांनी थेट आरोप करण्यास सुरुवात केली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जालन्यातील मराठा आंदोलनास्थळी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांवर हल्ला

पुण्यात माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, जालन्यातील घटनेचे राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना कशामुळे घडली, वस्तुस्थिती काय आहे हे चौकशीत समोर येईल. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचे समर्थन करू शकत नाही. मराठा समाज बांधवांनी शांतता ठेवावी. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी हा विषय हाताळला होता. मागास आयोगाची स्थापना करून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा नेला होता. त्यांनी सकारात्मक व खंबीर भूमिका घेतली होती.

आरक्षणाच्‍या प्रश्‍नावरुन गृहमंत्र्यांना बदनाम करण्‍याचा प्रयत्न; फडणवीसांच्या मदतीला विखे धावले…

उलट महाविकास आघाडीने आरक्षण घालविले आहे. आता त्यांचे नेते बोलू लागले आहेत. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची काय भूमिका होती हे सर्वश्रृत आहे. ते दुष्काळी दौऱ्यावर गेले असते तर ठीक होते. परंतु आज आंदोलनस्थळी जावून मराठा समाजाला भडकाविण्याचे काम करत आहेत. त्यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती, असा गंभीर आरोपही विखे यांनी पवारांचे नाव घेऊन केला आहे. त्यांनी समाजाच्या भावना समजून घेणे ठीक आहे. परंतु त्याचे राजकारण करणे थांबविले पाहिजे, असा सल्लाही विखेंनी दिला आहे.


शरद पवार सोयीप्रमाणे बोलतात

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना कोणत्याही अधिकार नाही. उलट महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. त्यामुळे त्यांनी तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्यायला हवा होता. परंतु सोयीप्रमाणे गप्प बसायचे, आपल्या सोयीप्रमाणे बोलायचे हा त्यांचा स्वभाव असल्याची टीकाही विखेंनी पवारांवर केली आहे.

उद्धव ठाकरेंनी काय दिवे लावले ?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. सरकारी वकीलांना फी दिलेले नाही. कागदपत्रेही दिलेले नाहीत. मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी काय दिवे लावले आहेत हे माहीत आहे. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा हा उद्धव ठाकरेंचा घ्यायला हवा होता. त्यांना त्यांचे राजकीय हित साधायचे आहे. आमचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कटिबध्द असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube