‘तथाकथित सभ्य लोकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहू नये’

  • Written By: Published:
‘तथाकथित सभ्य लोकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहू नये’

पुणेः लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा बाजू घेतली आहे. गौतमी पाटील गुन्हा काय असा प्रश्न सत्यशोधक सचिन माळी यांनी उपस्थित केलाय. तसेच गौतमी पाटीलवर आक्षेप घेणाऱ्यांचे वेगवेगळ्या मुद्दावरून कानही माळी यांनी टोचले आहेत.

गौतमी पाटीलचे नृत्य अश्लील आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमांवर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी सातत्याने काहीजण करताना दिसत आहेत. मागे तर तिला ऑन कॅमेरा माफी वगैरे मागायला लावली गेली होती. त्यावेळीच मला माझे मत मांडायचा होते पण ते राहून गेले. आता परत एकदा गौतमी पाटीलचा डान्स आई, वडील, भाऊ, बहीण एकत्र पाहू शकत नाहीत, तिच्या कार्यक्रमावर बंदी आणा, असा सूर उमटू लागल्यावर ही पोस्ट लिहित असल्याचे सचिन माळी यांनी म्हटले आहे.

सर्वात प्रथम श्लील-अश्लीलतेच्या मुद्द्यांची एकदा नीट चर्चा व्हायलाच हवी. परंतु हे सांगितलेच पाहिजे की, अश्लीलतेचे कारण पुढे करीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदीची मागणी करणे अत्यंत दांभिकपणाचेच लक्षण असल्याचे माळी यांनी म्हटलंय. जे तथाकथित सभ्य आहेत. त्यांनी फार तर तिचा कार्यक्रम पाहू नये. हा त्यांचा लोकशाही अधिकार शाबूत आहेच. परंतु समांतर सेन्सॉरशिप करू नये. गौतमी पाटीलला विरोध करणारे राधिका आपटे, सनी लियोनी, मल्लिका शेरावतचे चित्रपट जिभळ्या चाटत बघतात की नाही? हे ही एकदा तपासावे लागेल, असा मुद्दाही माळी यांनी उपस्थित केला.

खरंतर न्यूड्याडिटीची, नग्नतेची आणि कथित अश्लीलतेची भिती नेमकी कुणाला आणि का वाटते ? याचाही तळ शोधला पाहिजे. याची मूळ स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण प्रस्थापित करणाऱ्या जातिव्यवस्थेच्या पायात खोल रुजलेली दिसतील. योनिशुचिता हे ज्या जातिव्यवस्थेचे महत्वाचे लक्षण आहे. त्या देशात लैंगिक दमनाबद्दल बोललं गेलं पाहिजे. ही कोंडलेली लैंगिकता भाषेतून किंवा इतर काही कलांमधून व्यक्त होत आलेली आहे.

तमाशातले संवाद जेंव्हा काहींना अश्लील वाटतात तेंव्हा हे लक्षात घेतले पाहिजे की, समाजाची लैंगिकता बंदिस्त असल्याचे माळी म्हणतात. त्यामुळे कुणी मोकळेपणाने याबद्दल बोललं तर ते अश्लील वाटतं. मुळात समाज आजारी आहे. तमाशा कलावंत नाही. कलावंत या समाजाच्या आजाराला एक प्रकारे अधोरेखित करीत असतो.

परंतु हा तथाकथित सभ्य समाज कलावंताला गुन्हेगार ठरवतो आणि स्वतःच्या दमनकारी व्यवस्थेवर पांघरून घालून संस्कृतीरक्षणाच्या दांभिक बाता मारू लागतो. आता राहिला मुद्दा गौतमी पाटीलचा तर “माझा कार्यक्रम लावाच” असा कोणताही जबरदस्तीचा सूर तिने कुठे लावलेला नाही. ज्यांना हा कार्यक्रम बघायचा आहे ते तिचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत.

गौतमी पाटीलमुळे ज्यांचे कार्यक्रम कमी झाले किंवा बंद झाले त्यांनी स्पर्धेला खिलाडूवृत्तीने सामोरं जावं. त्यासाठी संस्कृती वगैरे गोष्टींचा वापर ढाल म्हणून करू नये, असा सल्ला ही काही तमाशाला कलावंतांना माळी यांनी दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube