अहमदनगरचे पालकमंत्रीपद विखेंकडे ‘सेफ’ : सुनील तटकरेंनी सांगितले कारण

अहमदनगरचे पालकमंत्रीपद विखेंकडे ‘सेफ’ : सुनील तटकरेंनी सांगितले कारण

Sunil Tatkare : गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या (Guardian Minister) वाटपाबाबत चर्चा सुरू होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रिपदाच्या वाटपावरुन शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात संघर्षही झाला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १२ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. मात्र, रायगड, नाशिक आणि नगरच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नाही. यावर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भाष्य केलं.

अजित पवार गटातील 7 मंत्र्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र, शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळालेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त भार उदय सामंत यांच्याकडे आहे. तर नाशिक आणि नगरच्या पालकमंत्रीपदा संदर्भातही कोणताचं निर्णय झाला नाही.

याविषयी आज पत्रकारांनी सुनील तटकरे यांनी विचारलं असता, ते म्हणाले की, लवकरात लवकर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होईल, असं आम्ही सांगत होतो. त्यानुसार आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना वेगवगेळ्या जिल्हांची पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे. मात्र, ज्यावेळी तीन पक्षाचं सरकार अस्तित्वात येतं असतं, तेव्हा वेगवळ्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती भिन्न असून शकते. त्यामुळं काही गोष्टींना विलंब होतो.

ते म्हणाले, नाशिकमध्ये आज राष्ट्रवादीचे पाच विधानसभा सदस्य आहेत. भुजबळांसारखे नेते राज्याच्या मंत्रिमंडलात 30 वर्षापासून काम करत आहेत. नगरमध्येही राष्ट्रवादीचे पाच आमदार आहेत. मात्र, नगर जिल्हयातून यावेळच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहभागी करून घेता आलं नाही. कारण, आमची मर्यादित संख्या आहे. त्यात सर्वांना सामावून घ्यायचं होतं, असं सांगत नगरचं पालकमंत्रीपद तुर्तास तरी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सेफ असल्याचं त्यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले.

आम्ही संपुर्ण बहुजन समाजाला सोबत घेत आहोत. रायगडचं प्रलंबित राहिलं असं नाही. नाशिकचाही विषय आहे. नाशिक, रायगड जिल्हा बाबतही लवकच निर्णय होईल. तिथं चर्चेने मार्ग निघेल, असं तटकरेंनी सांगितलं.

रायगडचे पालकमंत्री सामंत, तर नाशिकचे भुसे
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर भुजबळांचा डोळा होता. मात्र, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आहेत. सुनील तटकरे हेही आपली कन्या आदिती यांना हिला रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी आग्रही होते. मात्र रायगडमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी आदिती यांना पालकमंत्रीपद देण्यास विरोध केला होता. त्यामुळं नाशिक, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाविषयी सरकार काय निर्णय घेतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube